मतदारसंघ गमावण्याच्या भीतीने अनेक भाजप आमदारांच्या पोटात गोळा

सौरभ कुलश्रेष्ठ, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीत नवे मतदारसंघ बांधण्यासाठी सध्या ताब्यात नसलेले काही मतदारसंघ पुन्हा मिळविण्यावर शिवसेनेचा भर राहील, असे संकेत मिळू लागले आहेत. २०१४ च्या मोदी लाटेमुळे पराभव पत्करावा लागलेल्या व भाजपच्या ताब्यात गेलेल्या मतदारसंघांवर पुन्हा ताबा मिळवून जुने नेते व माजी आमदारांना पुन्हा सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी सेनेच्या तंबूत मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे.

युती टिकवण्यासाठी भाजपने या अटी मान्य केल्या, तर आपला पत्ता कापला जाईल या भीतीने भाजपच्या अनेक आमदारांच्या पोटात गोळा आला आहे.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभा निवडणुकीत युतीचे जागावाटप आणि सत्तापदांच्या वाटपावरून वेगळे सूर उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचा, अशी भूमिका वारंवार मांडली जात आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पालघर मतदारसंघ उमेदवारासह भाजपकडून खेचून घेतला. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात शिवसेना आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट आहे. एकही आमदार नसलेल्या भागांत विधानसभा निवडणुकीत जागा हवी, असा मुद्दा शिवसेनेकडून मांडला गेला असून त्यात सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या जागांचाही समावेश असल्याचे समजते.

नंदुरबार, धुळे, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, बीड, लातूर या १२ जिल्ह्य़ांतील एकही मतदारसंघात २०१४ मध्ये शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. पुण्यासारख्या प्रमुख शहरातही शिवसेनेला कोथरूडसारखे पारंपरिक मतदारसंघ गमवावे लागले. त्यामुळे असे गमावलेले मतदारसंघ जागावाटपात मिळावेत.

उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, आशीष जयस्वाल यांच्यासारख्या निवडून येणाऱ्या शिवसेनेचे नेते-आमदारांच्या मतदारसंघांचीही शिवसेनेला अपेक्षा आहे. यापैकी अनेक ठिकाणी सध्या भाजपचे आमदार असून जागावाटपात आपला पत्ता कापला जाण्याच्या भीतीने ते धास्तावले आहेत.

बदललेल्या परिस्थितीचा विचार अपेक्षित!

२०१४ मध्ये युती अचानक तुटली. शिवसेना बेसावध होती. त्या गडबडीत सतत निवडून येणारे अनेक नेते-आमदार पडले. शिवाय गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात संघटनेची बांधणी केली व संघटना रुजवली. शिवसेनेकडेही इतर पक्षांतून नेते येत आहेत. २०१४ च्या तुलनेत आता परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे जागावाटपात या सर्व गोष्टींचा विचार होईल अशी अपेक्षा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या  मनीषा कायंदे यांनी सांगितले.

युतीच्या जागावाटपाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात ठरले आहे, असे मुख्यमंत्री व ठाकरे यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार निर्णय होईल.

– माधव भांडारी, मुख्य प्रवक्ता, भाजप