गोव्यात भाजपाने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करुन लोकशाहीचा अपमानच केला होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. पर्रिकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण? हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रासले असून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पर्रिकर यांच्या गैरहजेरीत गोव्यात नेतृत्व बदल होणार, अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेसनेही सत्ता स्थापनेचा दावा करणार, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर टीका केली.

पर्रिकरांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून ढासळत असून त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन – चार मंत्र्यांच्या प्रकृतीतही बिघाड झाला आहे. त्यामुळे वर्षभरापासून गोव्याचे मंत्रिमंडळ जणू अतिदक्षता विभागातच दाखल झाले. प्रशासन अधांतरी व कामकाज बंद अशा अवस्थेत गोव्यासारखे राज्य सापडले असून राजकीय अस्थिरतेने अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्थिती योग्य नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

पर्रिकरांना सन्मानाने निवृत्त करून नवा नेता शोधावा तर भाजपात असा एकही ‘शुद्ध’ भाजपाई नेता नाही. श्रीपाद नाईक हे दिल्लीत आहेत व बाकी एखादा सोडला तर सगळेच भाजपाई हे आयाराम, गयाराम आणि घाशीराम आहेत. सौदेबाजी, तोडफोड करुन भाजपाने गोव्यात सत्ता स्थापन केली आणि नेतृत्व करण्यासाठी देशाच्या संरक्षणमंत्र्यांना म्हणजे मनोहर पर्रीकरांना गोव्यात पाठवले. ही भाजपाची, पर्रिकरांची सगळ्यात मोठी चूक होती, पण यावेळी पर्रिकरांचा सूर लागला नाही आणि गोव्याची गाडी व पर्रीकरांची प्रकृती घसरत गेली, अशी टीका शिवसेनेने केली आहे. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे. आयाराम, गयाराम व घाशीरामांच्या मदतीने राज्य निर्माण केले की काय घडते ते गोव्यात दिसते, अशा शब्दात शिवसेनेने भाजपाला फटकारले.