मैत्रीपूर्ण लढत झाल्यास बिघडले कुठे? अर्जुन खोतकर यांचा दावा

औरंगाबाद/जालना :  ‘मी मैदान सोडलेले नाही, मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितले होते लोकसभेच्या तयारीला लागा. त्यामुळे मी मैदानात आहे. एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली तर काय हरकत आहे. माझे मतही पंतप्रधान मोदी यांनाच असेल,’ असे म्हणत पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी युतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ‘युतीच्या निर्णयाचे स्वागत करतो. पण मला पुन्हा एकदा पक्षप्रमुखांशी बोलावे लागेल,’ असे खोतकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकायचा म्हणून खोतकर कामाला लागले होते. दोन्ही नेत्यांमध्ये  वक्तव्येही झाली होती. मात्र, युती झाल्यामुळे जालना लोकसभेची भाजपची जागा शिवसेनेला  घेता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी सूचना खोतकर यांनी केली आहे. दानवेंच्या विरोधात निवडणूक लढविण्यास खोतकर उत्सुक असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांना पाठबळ देण्याचे ठरवले होते. औरंगाबादचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी तर तसा जाहीर पाठिंबाच दिला होता. या मतदारसंघात काँग्रेसला ताकदीचा उमेदवार नव्हता. दानवे विरुद्ध अन्य सर्व पक्ष असे चित्र निर्माण करण्यात विरोधकांना यश आले होते. खोतकरांची विरोधक अशी राजकीय प्रतिमा निर्माण झाल्यामुळे दानवेंच्या अडचणीत भर पडेल, असे सांगितले जात होते. यामुळे खोतकरांनी निवडणुकीला उभे राहावे, यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेही प्रयत्नशील होते. त्यांनीही मतदारसंघात बांधणीला सुरुवात केली होती. युती झाली आणि खोतकरांची कोंडी झाली. आता या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग सुचविला आहे.

जालना लोकसभा मतदारसंघात या वेळेस काँग्रेसला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांतील शिवसेनेत दानवेंच्या कार्यपद्धतीविषयी अधिक रोष आहे. त्यामुळे युती झाली तरी मतदारसंघातील शिवसेना दानवेंच्या बाजूने राहण्याची शक्यता नाही. काँग्रेसचा उमेदवार जो कुणी असेल तो सर्वार्थाने दानवेंशी लढत देण्यासाठी सक्षम असेल.

-राजाभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

 सहा निवडणुकांपासून जालना भाजपचा अभेद्य गड आहे. खासदार दानवे यांनी मतदारसंघात केलेली विकासाची कामे जनतेसमोर आहे. दानवेंनी केलेल्या विकासकामांमुळे विरोधक हतबल झालेले आहेत. दानवेंसमोर आपला निभाव लागणार नाही याची जाणीव काँग्रेससह सर्व विरोधकांना झालेली आहे. आता शिवसेना व भाजपची युती झालेली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत नैराश्य आलेले आहे. दानवेंच्या विरोधात जनतेत नाराजी असल्याचा अपप्रचार विरोधक करीत असून त्यांना त्यामध्ये यश येणार नाही.

-रामेश्वर भांदरगे, अध्यक्ष जालना जिल्हा भाजपा

सहा निवडणुकांपासून जालना भाजपचा अभेद्य गड आहे. खासदार दानवे यांनी मतदारसंघात केलेली विकासाची कामे जनतेसमोर आहेत.  आता शिवसेना व भाजपची युती झालेली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत नैराश्य आलेले आहे. दानवेंच्या विरोधात जनतेत नाराजी असल्याचा अपप्रचार विरोधक करीत असून त्यांना त्यामध्ये यश येणार नाही.

-रामेश्वर भांदरगे, अध्यक्ष जालना जिल्हा भाजपा