मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नावं काही दिवसांपूर्वी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत झळकलं होतं. यावरूनच आता जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला हाणला आहे. “उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांचं काम जनतेला आवडल्यामुळे हे सरकार पडणार नाही. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावे,” असं गुलाबराव पाटील म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

“गेल्या नऊ महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम जनतेला आवडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबद्दल जनतेच्या चांगल्या भावना आहेत. त्यामुळे हे सरकार पडणार नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावीत,” अशी टीका पाटील यांनी केली.

आणखी वाचा- महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस नाही; सरकार आपणहूनच पडेल : देवेंद्र फडणवीस

काही दिवसांपूर्वी भजापाचे नेते नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीचं सरकर लवकरच पडेल असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरूनही पाटील यांनी टीकेचा बाण सोडला. “नारायण राणे यापूर्वी कुठे होते आणि आता ते कुठे आहेत. ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी काय होतं हे राज्यातील जनतेला ठाऊक आहे. प्रवीण दरेकर यांचीही तिच परिस्थिती आहे. तेदेखील आधी कुठे होते आणि आता कुठे आहेत. त्यांच्या वक्तव्यांना फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. भाजपाचे किती आमदार त्यांच्या सोबत राहतील हे दिसून येईलच. सत्ताबदलापेक्षा त्यांनी आपले आमदार सांभाळावेत,” असंही त्यांनी नमूद केलं. तसंच महाविकास आघाडीचे १७० आमदार कायमच सोबत राहणार असल्याचंही पाटील म्हणाले.