अहमदनगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी रवि खोल्लम याला अटक केली आहे. खोल्लम हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून हत्येपूर्वी त्याचे शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्याशी वाद झाले होते. या वादातूनच हत्येचा कट रचला गेला, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

केडगाव उपनगरात शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व विभागप्रमुख वसंत ठुबे या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी रवि रमेश खोल्लम (वय ४०) याला पुणे जिल्ह्यातून अटक केली. खोल्लमच्या चौकशीतून हत्या का झाली, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

रवि खोल्लम हा छायाचित्रकार म्हणून काम करतो. तो काँग्रेसचा पोटनिवडणुकीतील उमेदवार विशाल कोतकरचा जवळचा कार्यकर्ता आहे. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुणे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बसलेल्या शिवसेनेच्या संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांनी खोल्लमला फोन केला. निवडणूक प्रचारावरून दोघांत वाद झाले. कोतकर व ठुबे यांनी खोल्लमला ‘बघून घेतो’, असे सांगत ‘तू घरीच थांब येतो,’ असे धमकावले. ही माहिती खोल्लमने विशाल कोतकरला दिली. त्यानुसार विशालने संदीप गुंजाळ व इतरांना खोल्लमकडे पाठवले, अशी माहिती समोर आली आहे.

ही धमकी खोल्लमने मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली आणि ती विशालला ऐकवली. संजय कोतकर व वसंत ठुबे त्याच्याकडे येण्यास निघाल्यावर खोल्लम स्वत:च्या घरातून निघून गेला, त्याने पुन्हा ती रेकॉर्डिंग अन्य लोकांना ऐकवली व आता तुम्ही तुमचे काम करा, असेही त्याने सांगितले. त्यामुळेच हत्येचा कट रचला गेला असावा, या कटात खोल्लमचाही सहभाग असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी खोल्लमचा सीडीआर तपासायचा निर्णय घेतला आहे. हत्येनंतर खोल्लम कोठे होता, कोणाच्या सांगण्यावरून फरार झाला, त्याला कोणी मदत केली, याचीही माहिती पोलिस घेत आहेत. संदीप ऊर्फ जॉनी गिऱ्हे याच्याकडून जप्त करण्यात आलेली मोटरसायकलही त्याची नाही, त्याची कागदपत्रे पोलिसांना आरटीओकडे आढळली नाहीत, त्यामुळे त्याला ही मोटरसायकल कोणी उपलब्ध केली, याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र सर्वात प्रमुख आरोपी असलेला विशाल कोतकर अद्याप फरार आहे. दुहेरी हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे.