मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर सातत्यानं टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेनं प्रतित्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा माजी मुख्यमंत्री असा नामोल्लेख करत त्यांना एक ट्विट समर्पित केलं आहे. ज्यात त्यांनी फडणवीस यांना स्वाध्याय करण्याचा सल्ला दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे भूमिका मांडत आहे. सरकारच्या निर्णयांवर टीका करण्याबरोबरच शिवसेनेच्या भूमिकेवरही फडणवीस आणि भाजपाकडून टीका केली जात आहे. जेएनयूमध्ये सुरू झालेल्या वादावरूनही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेनं मार्मिक प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक शेर समर्पित केला आहे. ज्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या आधी विरोधी पक्षनेते न म्हणता माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. इतराच्या चुका काढत बसण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरिक्षण केलं असतं, तर आज ईश्वराचे दूत झाला असता, असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे इंडिया टुडे मासिकावर प्रसिद्ध झालेला फोटोही शेअर केला आहे.
“उम्र जाया कर दी लोगों ने
औरों के वजूद में नुक्स निकालते निकालते
इतना ही खुद को तराशा होता तो
फ़रिश्ते बन जाते
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समर्पित ,” असं प्रियंका चतुर्वेदी यांनी शेवटच्या ओळीत म्हटलं आहे.

अ‍ॅक्सिस बँकेतील खाती : अमृता फडणवीसांना दिलं होत उत्तर

प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. त्याचबरोबर त्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याही आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. ‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे,’ अमृता फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलं होतं. त्यावर “अमृता फडणवीस यांना शेवटची पण, छोटी नसलेली सूचना आहे. महाराष्ट्राला परिक्षण करून महाराष्ट्रानं काय करावं याचा हे शिकवण्याच काम नक्कीच एका अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याचं नाही. त्याची मुलाखत वाचून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोणत्या परिस्थिती अ‍ॅक्सिस बँकेत खाते वळवण्यात आले, याची चौकशी करावी. त्याचबरोबर अ‍ॅक्सिस बँकेत खाते वळवण्यात आल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेकडून भाजपाच्या योजनांसाठी सीएसआर निधी देण्यात आला होता की नाही, याचीही चौकशी करावी,” असं ट्विट करत चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांना उत्तर दिलं होतं.