भाजपा नेते नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. भेटीदरम्यान त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्यात चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. “भाजपाचं सरकार लंडन आणि न्यूयॉर्कमध्येही येऊ शकतं, पण महाराष्ट्रात नाही,” असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला हाणला.

“भाजपाचं सरकार लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं. त्या ठिकाणीही करोनाची स्थिती गंभीर आहे. भाजपाचे लोक तिकडेही सरकार स्थापन करू शकतात. पण महाराष्ट्रात त्यांचं सरकार येणार नाही,” असं म्हणत राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला. “राज्यात ज्यांना सरकार अस्थिर करण्याचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी तो घ्यावा. केवळ वेळ घालण्यासाठी विरोधी पक्ष असा खेळ खेळत असेल तर तो त्यांनी खेळावा. हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढच्या निवडणुकाही आम्ही एकत्र लढवू,” असं राऊत म्हणाले. “विरोधी पक्षानं काळजी घ्यायला हवी. जर कुणालाही धोका असेल तर तो त्यांनाच असेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- ठाकरे सरकारच्या स्थिरतेवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

विरोधकांनी गुजरातमध्ये आंदोलन करावं

करोनाच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर ती गुजरातमध्ये लावावी. न्यायालयानंही गुजरातमधील परिस्थितीत हाताबाहेर गेल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे. त्यामुळे विरोधकांनी गुजरातमध्ये आंदोलन करावं, असंही राऊत म्हणाले.

आणखी वाचा- करोना व ठाकरे सरकार; दोन्ही विरोधकांच्या हाताबाहेर – संजय राऊत

सरकार पाडण्याचा डोस सापडला नाही

“करोनावर लस आणि ठाकरे सरकारला पाडण्याचा डोस अजून सापडला नाही. सध्या त्यावर संशोधन सुपू आहे. त्यामुळे विरोधकांनी त्वरित क्वारंटाइन व्हावं. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न त्यांच्याच अंगलट येतील,” असंही ते यापूर्वी म्हणाले होते. “शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कोणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी,” असंही त्यांनी त्यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये नमूद केलं होतं.