युतीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले असतानाच आता शिवसेनेने फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. बाप हा बाप असतो, तो कसा बदलणार, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला विचारला आहे. युती झाली म्हणजे हिंदुत्वाचा विजय झाला का?, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

सोमवारी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. ‘‘भाजपा युतीसाठी लाचार नाही. आम्हाला युती हवी आहे, पण ती देशाच्या कल्याणासाठी हवी आहे. चोरांच्या हातात सत्तेच्या चाव्या जाऊ नयेत. जे पाकिस्तानधार्जिण्यांना सोबत घेऊन काम करतात, त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये म्हणून युतीसाठी प्रयत्न करत आहोत. पण याचा अर्थ असा नाही, की भाजपा लाचार आहे, ज्यांना हिंदुत्व हवे आहे, ते आपल्या सोबत येतील. जे हिंदुत्वाच्या विरोधात आहेत, ते त्यांच्यासोबत जातील. ‘जो आयेगा उसके साथ, जो नही आयेगा उसके बिना’. आता भाजपचा कार्यकर्ता थांबणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

फडणवीस यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदुत्वासाठी युती व्हावी असे बोलत आहेत, परंतु देशात राम मंदिर, समान नागरी कायदा, कलम ३७०, काश्मीर प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत, हे सगळे हिंदुत्वाशी संबधित प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवणे म्हणजे राजकीय हिंदुत्व, असे संजय राऊत यांनी नमूद केले. युती झाली म्हणजे हिंदुत्वाचा विजय झाला का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. बाप हा बाप असतो आणि बाप कधी बदलू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.