“काँग्रेसच्या काही नेत्यांची मुलाखत मी वाचल्या आहेत. खासकरून अशोक चव्हाण यांची. त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी,” असं प्रतिक्रिया शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिली.

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं काँग्रेसवर टीका शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून केली होती.

आणखी वाचा- राऊतांनी लिहिलेला अग्रलेख अपूर्ण माहितीच्या आधारावर; थोरातांचं प्रत्युत्तर

“काँग्रेसच्या काही नेत्यांची मुलाखत मी वाचल्या आहेत. खासकरून अशोक चव्हाण यांची. त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. ही बाब प्रशासन आणि सरकारच्या संघर्षाची नाही. यावेळी महाराष्ट्रात करोना आणि चक्रीवादळाचं मोठं संकट आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी सामना अग्रलेखाबाबत माध्यमांशी बोलताना दिली.

आणखी वाचा- जुनी खाट का कुरकुरतेय?; शिवसेनेची काँग्रेसवर टीका

काय म्हटलंय अग्रलेखात ?

उद्धव ठाकरे सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री झाले, तेव्हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले गेले. त्याही स्थितीत काही पोटदुख्या लोकांनी असा पेच टाकला होता की, हे राज्य महिनाभर तरी टिकेल काय? मात्र तसे काही घडले नाही. घडण्याची शक्यताही नाही. सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही.

काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणेही तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच. ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू,’ असे थोरातांनी सांगितले. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक जोरदार मुलाखत दिली व तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितले की, ‘‘सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये जरा आमचेही ऐका. प्रशासनातील अधिकारी म्हणजे नोकरशाही वाद निर्माण करीत आहे. आम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशीच बोलू!’’

मुख्यमंत्री त्यांचे म्हणणे ऐकतील व निर्णय घेतील, पण काँग्रेसचे नेमके म्हणणे काय आहे? राजकारणातील ही जुनी खाट महाराष्ट्रात कुरकुरू का लागली आहे? आमचे ऐका म्हणजे काय? यावरही आता झोत पडला आहे. थोरात व चव्हाण हे काँग्रेसचे अनुभवी नेते आहेत व त्यांना सरकार चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, असा दांडगा अनुभव शरद पवार व त्यांच्या पक्षाच्या लोकांपाशीही आहे. तथापि कुरकुर व कुरबुर होताना दिसत नाही.