लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियंका गांधी- वढेरा यांची उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला किती जागांवर फायदा होणार, यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अंदाज व्यक्त केला आहे. प्रियंका गांधींमुळे काँग्रेसचा फायदा होईल आणि उत्तर प्रदेशातील 10 ते 12 जागांवर त्या प्रभाव टाकतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

संजय राऊत यांनी बुधवारी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियंका गांधींविषयी भूमिका स्पष्ट केली. प्रियंका गांधी आता सक्रीय राजकारणात आल्या आहेत आणि याचा काँग्रेसला फायदा होईल का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर राऊत म्हणाले, प्रियंका गांधी यांच्या आगमनामुळे काँग्रेसला नक्कीच फायदा होईल. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे तिथे मतदार आहेत. तरी देखील यातील एका वर्गाचे अजूनही काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर प्रेम आहे. प्रियंका गांधी यांच्या प्रवेशामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसला 10 ते 15 जागांवर फायदा होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी सामनाच्या अग्रलेखातून युतीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली नाही. 2014 नंतर तलवारी उपसल्या व पुढील चार वर्षे प्रत्येकजण तलवारीस धार काढीत राहिला. पण शिवसेनेची तलवार दुधारी आहे. असे यात म्हटले होते. राहुल गांधी यांचे प्रगतिपुस्तक 2014 च्या तुलनेत नक्कीच सुधारले आहे. मदतीला प्रियंका आलीच आहे, पण मोदी यांच्या नेतृत्वाशी त्यांची तुलना करता येणार नाही, असे या अग्रलेखात म्हटले होते.