“नारायण राणे यांना भाजपात प्रवेश द्यायचा की नाही हा भाजपाचा प्रश्न आहे. त्यांच्या प्रवेशाला आमचा विरोध नाही. तसेच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मांडली आहे.

छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध असणाऱ्या येवला मतदारसंघातील शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिकांनी पक्षाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. भुजबळांना पक्षात घेऊ नका, अशी मागणी त्यांनी केली. “भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही”, असे आश्वासन राऊत यांनी दिले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, “आर्थिक मंदीमुळे देशात बेरोजगारी वाढत आहे. भारतात रशियासारखी परिस्थिती निर्माण व्हायला नको. मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात. काँग्रेस सरकारच्या काळातही मोठी मंदी आली होती, मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अत्यंत उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढले”, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना राऊत म्हणाले, “आगामी निवडणुकीसाठी समान जागा वाटप होणार आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात तसं ठरले आहे. गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुका जाहीर होतील, असे सांगत नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला आमचा विरोध नाही”, असे त्यांनी स्पष्ट केले. “सगळ्यांना पक्षात घ्यायला आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही. आम्ही पारखून नेत्यांना पक्ष प्रवेश देत आहोत. छगन भुजबळ यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. “मी आहे तिथेच बरा आहे.” असे भुजबळ यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे चित्र स्पष्ट झालेले आहे”, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.