मोदी सरकानं मुंबईत प्रस्तावित असलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. या निर्णयावरून राज्यातील राजकारणही बरंच तापलं आहे. या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंतीही काही नेत्यांनी केली आहे. अशात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्रावर अन्याय करणारे निर्णय होत असताना विरोधी पक्ष जे बोलत आहे, आश्चर्यकारक आहे,” असं म्हणत राऊत यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला.

राज्यात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, तर दुसरीकडं वेगवेगळ्या मुद्यांवरून तापणार राजकारण अशा विविध विषयांवर खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत भूमिका मांडली. यावेळी त्यांना मुंबईत प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राविषयी भाजपा नेत्यांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांवर टीका केली.

आणखी वाचा- दारुची दुकाने उघडा, या आवाहनामागची राज ठाकरेंची भावना चांगली असेल पण… – शिवसेना

“महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांची लोक आहेत, त्यांचं वित्तीय सेवा केंद्रासंदर्भातील बोलणं आश्चर्यकारक आहे. खरं तर अशा प्रश्नावर विरोधी पक्षाला सरकारला धारेवर धरण्याची संधी असते. पण, या सगळ्या प्रकरणाशी उद्धव ठाकरे यांचा काहीही संबंध नाही. कारण ते आता सत्तेत आले. हा निर्णय आधीचा आहे. मात्र, विरोधी पक्षनेता जो असतो, त्यानं महाराष्ट्राच्या बाजूनं रान उठवायला हवं. त्यानं सरकारवर तोफ डागली पाहिजे. सरकार आमचं असले तरी मी हे म्हणतोय. आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र मुख्यमंत्र्यांनी जाऊ कसं दिलं? पण इथं वेगळंच आहे. राज्याच्या इतिहासात मला प्रथमच असा विरोधी पक्ष दिसतोय, जो कुठल्याही प्रश्नावर महाराष्ट्राची बाजूच घेत नाहीये. तो महाराष्ट्राच्या विरोधात घडणाऱ्या घटनांची आणि त्यांच्या नेत्यांची बाजू घेत आहे. नरेंद्र मोदी आमचेही नेते आहेत. देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. आमचं त्यांच्याशी वैयक्तिक भांडण असूच शकत नाही. पण, हा महाराष्ट्राच्या हक्काचा प्रश्न आहे. अधिकाराचा, अस्मितेचा प्रश्न आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष, त्यांचे नेते पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. यासाठी त्यांचा आत्मा तळमळला पाहिजे. तुमचा वकिली बाणा गेला खड्यात, त्यांनी महाराष्ट्रावर हा अन्याय होतोय म्हणून आवाज तरी उठवला पाहिजे. जर हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, असं कोणाला वाटत नसेल, तर तुम्ही या महाराष्ट्राचं राजकारण करण्यास नालायक आहात,” अशी तोफ संजय राऊत यांनी डागली.