मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसानं तडाखा दिला आहे. पिकांचं प्रचंड नुकसानं झालं असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना उद्धव ठाकरे म्हणाले,”तुम्ही आमचे अन्नदाते आहात. परिस्थिती दुर्दैवी असली तर खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे,” अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी ओल्या दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिली.

राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणासह राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, द्राक्ष यासह अनेक पिके भूईसपाट झाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात कानडगाव येथे नुकसानग्रस्त भागाची उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. त्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”आत्महत्या करण्याचा विचारही मनात आणू नका. तुम्ही माझे कुटुंबीय आहात. तुम्हाला कुटुंबीय म्हणून वचन देतो. परिस्थिती दुर्दैवी आहे. पण खचून जाऊ नका,” असं सांगत “अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जर नोटिसा बजावत असाल तर त्या जाळूच पण, तुम्हालासुद्धा वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी कर्जवसुलीसाठी नोटिसा बजावणाऱ्या बँकाना दिला.

यावेळी सरकारविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पंचनाम्याची थेरं करू नका, शेतकऱ्यांना मदत करताना कागदपत्रांचा घोळ घालू नका. शेतकऱ्यांना थेट मदत द्या. १० हजार कोटी मदतीसाठी पुरेसे नाहीत. जे धाडस कुणीही करणार नाही, ते धाडस तुम्ही करता. माझा शेतकरी मर्द आहे. तो या संकटावर मात करेल. आत्महत्येचा विचार करू नका. मी तुम्हाला न्याय द्यायला आलो आहे. आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. तुम्ही माझी ताकद आहात. पावसाचं दुष्टचक्र आपल्या मागं लागलं आहे. सध्या अन्नदाता संकटात आहे. हे काही महाराष्ट्राला शोभेसं चित्र नाही. तुम्ही आमचे अन्नदाते आहात. तुम्ही कष्टाने कमवलेल्या अन्नावर आम्ही मजा करतो. मुंबईत बसूनही मला तुमची स्थिती कळली होती, पण मी नाटक करायला नाही तर तुम्हाला धीर द्यायला आलो आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.