मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमीपूजनच्या निमित्ताने सुरू झालेले भाजपा-सेना युतीतील वादंगाचे कवित्व संपण्याची चिन्हे नसून जिल्ह्यात संधी मिळेल तेव्हा कुरघोडी करण्याच्या भाजपाच्या राजकारणामुळे शिवसेनेचे नेते अस्वस्थ आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन गेल्या शुक्रवारी (२९ जानेवारी) झाले. या संपूर्ण कार्यक्रमावर भाजपाची पकड होती. कार्यक्रमासाठी श्रोते आणण्याची जबाबदारीही या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली होती. तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना या योजनेच्या पाठपुराव्याचे श्रेय देत कार्यक्रमासाठी खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे सेनेचे नेते आधीच अस्वस्थ होते. त्यात राणे यांनी खास पत्रकार परिषद घेऊन सेना नेतृत्वावर सडकून टीका केली. भाजपानेच त्यांना ही संधी उपलब्ध करून दिल्याचा सेना नेत्यांचा आरोप आहे. तसेच राज्य व केंद्र शासनातर्फे जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या पाठपुराव्याचे उचित श्रेय सेनेला हेतूपुरस्सर दिले जात नसल्याची तक्रार आहे. पक्षाचे आमदार उदय सामंत आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी त्याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारमध्ये असलेले सेनेचे नेते अनंत गिते हेही या योजना कोकणात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद केले.
रत्नागिरी जिल्हा परिषद, रत्नागिरी नगर परिषद, देवरूख नगरपंचायत इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका-पोटनिवडणुका किंवा पदाधिकारी निवडीतही भाजपा संधी मिळेल तेव्हा कुरघोडी करत असल्याची सेनानेत्यांची तक्रार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेतील स्पष्ट बहुमताचा फायदा उठवत सेनानेत्याकडून सभापती पदांच्या वाटपात वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याची भाजपा नेत्यांची तक्रार आहे. भाजपा जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेले माजी आमदार बाळ माने आणि त्यांना विधानसभा निवडणुकीत लागोपाठ तीन वेळा पराभूत केलेले सेनेचे आमदार उदय सामंत यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. मानेंवर पक्षाने सोपवलेल्या नव्या जबाबदारीमुळे जिल्ह्यातील युतीचे संबंध जास्त ताणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य पातळीवरही भाजपा आणि शिवसेनेत वेळोवेळी होणारी धुसफूस लक्षात घेता हे त्याचेच जिल्हा पातळीवरील स्वरूप असल्याचे मानले जात आहे.