राज्याच्या मंत्रिमंडळातील नगरविकास मंत्री आणि ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतीची चांगलीच आवड असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकारणातून वेळ काढत ते आपली शेती करण्याची आवड जपताना दिसतात. जसा वेळ मिळेल तसे वारंवार आपल्या जन्मगावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या ठिकाणी येतात. गावी आल्यानंतर ते आपल्या शेतीकडे विशेष लक्ष देतात.

पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे महाराष्ट्रात शेतीची कामे सुरू आहेत. सर्वत्र भात, नाचणी, वरी या पावसाळी पिकांच्या पेरण्या सुरु आहेत. याच कालावधी मध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांनी शेतीकडे लक्ष दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट केले आहे. तसेच पारंपरिक पद्धतीने तरव्याच्या ठिकाणी पेरणी करुन कुदळ्याने संपूर्ण तरवा कुदळून भाताची पेरणी पूर्ण केली आहे. शिंदे हे पूर्वीपासून कायम गावी आल्यावर शेतीची कामे ही आवर्जून करत असतात.

राजकारणातून वेळ काढत आपल्या शेतीची आवड जपणे ही फार कठीण गोष्ट आहे. तरीही ही आवड मंत्री एकनाथ शिंदे जपताना दिसून येतात. इतक्या वर्षांपासून राजकारणामध्ये वावरत असताना सुद्धा त्यांची शेती आणि गावाकडील नाळ तुटलेली नाही. त्यांनी उन्हाळ्यात गावी आल्यावर स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. त्याला लागूनच शेततळे तयार करून त्यात मासे देखील सोडले आहेत.