पालघरची जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता

नीरज राऊत, पालघर

युतीमध्ये शिवसेनेला देण्यात येणारी एक अतिरिक्त जागा पालघरची असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने गेल्या वर्षीच काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेले खासदार राजेंद्र गावित तसेच अन्य पक्षांमधून आलेल्या कार्यकर्त्यांचे भवितव्यच धोक्यात आले आहे.

खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांनी पोटनिवडणुकीच्या पूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. पालघर पोटनिवडणुकीच्या प्रसंगी शिवसेनेने पालघरची जागा प्रतिष्ठेची करून पूर्ण ताकद पणाला लावली होती. भाजपाने पालघर लोकसभेच्या जागेसाठी आयत्यावेळी राजेंद्र गावित यांना काँग्रेसमधून आयात करून ही जागा राखली होती. पालघर पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने गावित समर्थकांसह अनेक पक्षातील मंडळींनी भाजपा प्रवेश केला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असताना पालघरची जागा शिवसेनेच्या पदरात पडली असल्याचा दावा स्थानिक शिवसेना नेत्यांनी केला आहे. पालघर जागेवर दावा सांगण्याच्या प्रयत्न जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला असला तरी वरिष्ठांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे.

पालघरची लोकसभा जागा शिवसेनेला बहाल करण्यात आली तर जिल्ह्यातील पक्ष संघटना कोलमडून जाईल, अशा चिंतेमध्ये भाजपाचे जिल्हा पदाधिकारी आहेत. असे होऊ  नये म्हणून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी काल तीन तास प्रदेश कार्यालयात ठाण मांडून बसले होते. या प्रकरणी दबाव कायम राहावा म्हणून ६० जिल्हा पदाधिकाऱ्यांनी  सामुदायिक राजीनामे दिले आहेत. खासदार आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांसह दिल्लीमधील नेत्यांशी भेटीगाठीचे सत्र सुरू ठेवले आहे.

लोकसभेपूर्वी होणाऱ्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत सेना- भाजपामध्ये युती करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे पालघर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या काही नगरसेवकांना तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या हालचालीला अचानकपणे पूर्णविराम मिळाला आहे. युतीच्या या समीकरणात महिलांसाठी राखीव नगराध्यक्षपद हे शिवसेनेच्या वाटय़ाला जाणार असल्याने नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत.  पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला मिळणार या कल्पनेवर स्थानिक शिवसेना पदाधिकारी आनंदात आहेत. पालघरची जागा शिवसेनेकडे गेल्यास पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश घेतलेले राजेंद्र गावित आणि त्यांच्या समर्थकांचे पुनर्वसन कशा पद्धतीने होणार याकडे स्थानिक मंडळींचे लक्ष लागून राहिले आहे.

गावितांना विधानसभेची जागा?

शिवसेना व भाजपामध्ये युती होण्यास पालघर लोकसभेच्या जागेचा प्रामुख्याने अडथळा असल्याचे बोलले जात होते. मात्र युतीच्या चर्चेमध्ये पालघरची जागा शिवसेनेला देण्याबाबत भाजपा नेत्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर युतीची बोलणी झपाटय़ाने झाल्याची चर्चा आहे. पालघरचे जागा शिवसेनेला सोडल्यास पालघर विधानसभेच्या जागेवर राजेंद्र गावित यांना संधी दिली जाईल, असे आश्वासन भाजपामधील काही वरिष्ठ मंडळी देत आहेत. मुळात शिवसेना ही पालघर विधानसभेत सत्तास्थानी असताना आणि शिवसेनेचे या भागात वर्चस्व असताना पालघरची जागा सेना का सोडले, हा सवाल उपस्थित होत आहे. त्यापलीकडे जाऊन भाजपाने पालघरो विधानसभा लढवली तर शिवसैनिक पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरतील का याबद्दल खुद्द भाजपा नेते साशंक आहेत.

भाजप कार्यकर्त्यांचा ‘नोटा’चा इशारा

पालघर लोकसभेची जागा ही भाजपाचीच असल्याचा दावा करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. स्थानिक पातळीवर शिवसेनेकडून अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने भाजपा नेत्यांमध्ये सेनेच्या मंडळींप्रति मतभेदाची भावना निर्माण झाल्याने ही जागा शिवसेनेकडे गेल्यास मध्य प्रदेशमध्ये राबवल्याप्रमाणे पालघरमधील भाजप कार्यकर्ते ‘नोटा मोड’चा अवलंब करतील, असा इशारा कार्यकर्ते खासगीत देऊ  लागले आहेत.