वरळी येथील पोद्दार रुग्णालयातील काही व्हिडीओ व्हायरल होत होते. त्यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून तेथील लोकांना दुसरीकडे हलवण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी ट्विटरवरून यासंबंधी माहिती दिली आहे.

वरळीतल्या काही जणांना या ठिकाणी असलेल्या पोद्दार रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आलं होतं. दरम्यान, या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तसंच या ठिकाणी असलेले रुग्णच कचरा काढत असल्याचंही त्या व्हिडीओमध्ये दिसत होतं. याव्यतिरिक्त महिलांनाही प्रसाधनगृहांची योग्य सुविधा नसल्याचंही काहींनी व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई केली आहे. त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

वरळी पोद्दार हॉस्पिटल मधून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काल जी गैरसोय झाली होती आणि त्यासाठी जी व्यक्ती जबाबदार होती, त्यांच्यावर कारवाई झाली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. तसंच या लोकांना दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. मला त्यांनी नवीन व्हिडिओ पाठवले आहेत. मी त्यांच्याशी स्वतः संपर्क साधून चूक केलेल्या व्यक्तीच्यावतीने माफी देखील मागितली. त्यांना भविष्यात कधी गरज भासल्यास संपर्क साधता यावा यासाठी मी त्यांना माझा संपर्क क्रमांक दिला आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.