गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे. सत्तांतराबद्दलचे तर्कवितर्क लावले जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या वैयक्तिक भेटीबद्दलही चर्चा होत आहे. या राजकीय चर्चांना होत असतानाच आज शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपाशी जुळवून घेण्याची विनंती सरनाईक यांनी केली आहे. या पत्रानंतर आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून देणारं ट्विट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक हे मागील काही महिन्यांपासून केंद्रीय यंत्रणांच्या तपासामुळे चर्चेत आहेत. तपासाच्या या ससेमिऱ्याला कंटाळून सरनाईक यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं. हे पत्र आज समोर आलं असून, त्यावरून बरीच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सत्तांतराचे संकेत देणारं एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. नितेश राणे यांनी दोनच वाक्यात ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं ब्रीद असलेल्या ‘हीच ती वेळ’चाही उल्लेख केला आहे.

हेही वाचा- लेटरबॉम्ब : “साहेब, नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरं”; वाचा सरनाईकांच्या पत्रातील १२ मुद्दे

“महाराष्ट्रात “भगव्या” च राज्य येते आहे…हीच ती वेळ !!!,” असं नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातील विविध विषय निकाली काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक बैठक झाली. या बैठकीवरून बरेच तर्कविर्तक लावले जात आहे. शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार असल्याचीही भाकितंही केली जात आहे. त्यातच आता प्रताप सरनाईक यांनी दिलेली युतीची हाक आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या निवडणूक जाहीरनाम्याचं ब्रीद वाक्य असलेल्या ‘हीच ती वेळ’चा उल्लेख करत सत्तांतराचे दिलेले संकेत, यामुळे राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा- प्रताप सरनाईक जेलचे पाहुणे होणारच; सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर सोमय्यांचा इशारा

राष्ट्रवादी-काँग्रेसवाले आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत- सरनाईक

“साहेब, आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. करोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचा संभाळ केला आहे. त्याबद्दल आपले खरोखर कौतुक करावे तितके कमी आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे,” असं सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mla pratap sarnaik letter to uddhav thackeray nitesh rane tweet maharashtra politics bmh
First published on: 20-06-2021 at 16:15 IST