News Flash

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी

कोल्हापुरात निवडणुका आल्या की वारेमाप पैसा उधळला जातो

कोल्हापुरातील मेळाव्यात शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापुरात रविवारी शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना बघायला मिळाला. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. चंद्रकांत पाटील यांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा गैरवापर करत अमाप संपत्ती मिळवली असा गंभीर आरोप क्षीरसागर यांनी केला. पाटील यांच्या संपत्तीची ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयातर्फे चौकशी करण्यात यावी अशीही मागणी क्षीरसागर यांनी केली. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

२००९ मध्ये मी आणि चंद्रकांत पाटील दोघेही आमदार झालो. आजही दोघे एकत्र काम करत आहोत, मात्र चंद्रकांत पाटील यांची तेव्हाची आणि आत्ताची आर्थिक परिस्थिती यामध्ये भरपूर फरक पडला आहे अशी तुलनाही क्षीरसागर यांनी केली. सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खात्याचा गैरकारभार झाल्यानेच चंद्रकांत पाटील यांची संपत्ती वाढली. कोल्हापुरात निवडणुका आल्या की लाखो रूपयांची उधळण केली जाते. हा पैसा येतो कुठून? याची चौकशी ईडीमार्फत झालीच पाहिजे अशीही मागणी राजेश क्षीरसागर यांनी केली.

शिवसेनेच्या वतीने भाऊबीजेचे औचित्य साधत  रविवारी एक हजार महिलांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. क्षीरसागर यांचाच या कार्यक्रमासाठी पुढाकार होता. या कार्यक्रमात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या कार्यक्रमाला खासदार गजानन किर्तीकर, अरूण दुधवडकर यांचीही उपस्थिती होती. गेल्या आठवड्यात कीर्तीकर यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांवर बोट ठेवले होते.

शिवसेना नेते अरूण दुधवडकर यांनीही त्यांच्या भाषणात क्षीरसागर यांचे मुद्दे योग्यच असल्याचे स्पष्ट केले. कोल्हापुरात वारेमाप पैसे वाटून निवडणूक जिंकण्याचा उद्योग घोसाळकर या व्यक्तीने केला होता . तरीही कोल्हापुरात शिवसेनेचाच आमदार निवडून आला होता . तेव्हापासून इथे कोणी पैसे वाटून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला तर त्याचा ‘घोसाळकर’ होतो असे म्हटले जाते. आताही चंद्रकांत पाटील यांनी असलाच प्रकार सुरू केला असल्याने त्यांचा आगामी निवडणुकीत त्यांचा ‘घोसाळकर’ होणार याची खूणगाठ बांधावी असेही दुधवडकर यांनी स्पष्ट केले. आता शिवसेनेच्या या आरोपांना चंद्रकांत पाटील कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2017 9:22 pm

Web Title: shiv sena mla rajesh kshirsagar criticized revenue minister chandrakant patil
टॅग : Chandrakant Patil
Next Stories
1 शेकापचे ज्येष्ठ नेते भाई एस.एम.पाटील यांचे निधन
2 बंदी असलेले कीटकनाशक विकणाऱ्यांवर आणि कंपनीवर गुन्हे दाखल करा : मुख्यमंत्री
3 मनसेने फेरीवाल्यांऐवजी सीमेवर जाऊन पाकच्या सैनिकांना मारावे : आठवले
Just Now!
X