News Flash

शिवसेना आमदाराचा अमृता फडणवीस यांना टोला; म्हणाल्या, “हा प्रश्न देवेंद्रजींना…”

मेट्रो कारशेडवरून अल्प बुद्धी, बहु गर्वी असल्याचं म्हणत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला होता.

सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये मेट्रो कारशेड मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण रंगलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरेमधील मेट्रो कारशेड तयार करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केला. याऐवजी मेट्रोचं नवीन कारशेड हे कांजुरमार्गला बांधण्यात येण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या जागेच्या मालकीवरुन राज्य विरुद्ध केंद्र सरकार असा नवीन संघर्ष सुरु झाला आहे. त्यानंतर अल्प बुद्धी, बहु गर्वी असल्याचं म्हणत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? असा सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

“हा प्रश्न देवेंद्रजीना विचारला असता तर बरं झालं असतं. दिल्लीच्या नादाला लागून त्यांनी महाराष्ट्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला होता. वर्षभरापासून तो पूर्वपदावर येत आहे. काळजी नसावी. बाकी ‘अल्प बुद्धी’ दिसतेच आहे,” असं म्हणत यामिनी जाधव यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.

काय म्हणाल्या होत्या फडणवीस?

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या ट्विटवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया देत अल्प बुद्धी, बहु गर्वी… कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? असा सवाल विचारला होता.

दरम्यान, मेट्रो कार शेड कांजुरला करण्याचा निर्णय घोषित झाला आहे त्याबाबत सरकारने काही खुलासे करण्याची गरज आहे. असे सांगत आम्ही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा डीपीआर झालाय आहे का? त्याचा टेक्निकल स्टडी झाला आहे का? त्याचा ऑपरेशनल प्लॅन तयार झाला आहे का? या तिन्ही गोष्टींचा अभाव असताना केवळ एक वाक्य फेकायचं आणि जनतेला भ्रमित करायचे असे चित्र आहे असे आम्ही सांगितले होते. शून्य पैशांमध्ये जागा ही केवळ घोषणा आहे. कारण ज्या जागेवर प्रस्तावित कारशेडचा मुद्दा राज्य सरकार म्हणते आहे, ती जागा मिठागरांची आहे, त्याबाबत मिठागर आयुक्तांकडून परवानगी घेतल्याचे दिसत नाही, त्यामुळे ती जागा जर राज्य सरकारने आपल्या नावावर केली असेल तर त्याच्या वैधतेवरच प्रश्न निर्माण होते, असा आरोप करत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 9:35 am

Web Title: shiv sena mla yamini jadhav criticize amruta devendra fadnavis metro carshed tweet mumbai jud 87
Next Stories
1 अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर कंगना ठाकरे सरकारवर संतापली; म्हणाली…
2 हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला? – भाजपा
3 मराठा आरक्षण : अशोक चव्हाणांना समितीतून बाहेर काढणं ही पहिली मागणी असावी – निलेश राणे
Just Now!
X