शिवसेनेचे आमदार कदम यांचा खासदार तटकरेंविरोधात हक्कभंग

मुंबई : रायगड जिल्ह्य़ात एकमेकांवर कु रघोडीच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीचे पुन्हा बिनसले असून शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावाचे पत्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना पाठवले आहे. सत्ताधारी आघाडीतील आमदाराने मित्रपक्षाच्या खासदारांविरोधात अशारितीने हक्कभंग दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काही महिन्यांआधी रायगड जिल्ह्य़ात एकमेकांवर कु रघोडीच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बिनसले होते. त्यात समेट घडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. पण तो सलोखा टिकू  शकला नाही. मतदारसंघातील विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्यात माजी आमदाराला निमंत्रण दिले पण विद्यमान शिवसेना आमदार योगेश कदम यांना डावलल्याने हा संघर्ष पुन्हा पेटला आहे.

माझ्या मतदारसंघातील विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात माजी आमदारला बोलवण्यात आले आणि तेथील फलकावरही उल्लेख के ला. पण मी विद्यमान आमदार असतानाही समारंभाचे निमंत्रणही पाठवले नाही आणि नावही वगळले. विधानसभेचा सदस्य या नात्याने असलेल्या हक्कांचा हा भंग आहे. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांच्यावर हक्काभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याचे पत्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना पाठवल्याचे योगश कदम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

तर माझ्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद होणार असतील तर माझ्यावर कारवाई करा, अशी भूमिका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे. मंडणगड तालुक्यात शिवसेनेतून काही स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत येणार होते. पण आघाडीचे सरकार असल्याने मी ते थांबवले.

पण दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी आमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना फोडून आपल्या पक्षात घेतले, याबद्दल तटकरे यांनी नाराजीही व्यक्त के ली.