सर्व स्तरावर अपयशी ठरलेल्या केंद्र शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शहरासह जिल्हय़ात अनेक ठिकाणी सोळामुखी राक्षसाच्या प्रतिकृतीचे दहन शुक्रवारी करण्यात आले. हातकणंगले, इचलकरंजी येथे शिवसैनिकांनी मोर्चा काढला. तर शिरोळ येथे प्रतिकृतींचे दहन करताना शिवसैनिक व पोलिसात झटापट उडाली.    
केंद्र शासन महागाई, महिलांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी अशा सर्वच बाबतीत निष्क्रिय ठरले आहे. सोळा पक्षांचे सरकार असूनही त्यांना वाढत्या अपप्रवृत्तीस आळा घालण्यात अपयश आले आहे. त्यामुळे सोळा पक्षांचा समावेश असलेल्या शासनाची प्रतीकात्मक सोळामुखी राक्षसाची प्रतिकृती बनवून तिचे दहन करण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यानुसार जिल्हय़ात शिवसैनिकांनी अशाप्रकारची आंदोलने केली.     
शहरात जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली राक्षसाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. आंदोलनात रवि चौगुले, दिलीप पाटील, नगरसेवक संभाजी जाधव, अरुणा टिपुगडे, सुजित चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांचा समावेश होता. हातकणंगले येथे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. इचलकरंजीत शहरप्रमुख धनाजी मोरे यांच्यासह शिवसैनिकांनी मोर्चा काढून प्रतिकृतीचे दहन केले. शिरोळ तहसील कार्यालयावर शिवसैनिकांनी निदर्शने केली. या वेळी पुतळा जाळण्याच्या प्रयत्नातून शिवसैनिक व पोलिसांच्यात झटापट उडाली.