पालकमंत्री दिवाकर रावते यांच्यावर खासदार जाधव यांची टीका

सर्वसामान्य शिवसनिकाकडे जायला पालकमंत्र्यांना वेळ नाही. मात्र, विरोधी पक्षाच्या आमदाराच्या दूध डेअरीवर जाण्यास वेळ कसा मिळतो, असा जाहीर सवाल उपस्थित करून खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्यावर पाथरी येथील कार्यक्रमात थेट हल्ला चढवला. पालकमंत्री हे विरोधकांना निधी देत आहेत, असेही ते म्हणाले.

पाथरी येथे आगामी निवडणुकीसंदर्भात शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री रावते व खासदार जाधव यांच्यातील बेबनाव पूर्वीच उघड झाला होता. परभणीत गेल्या दीड महिन्यापूर्वी दोघांमधील धुसफूस वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने शिवसनिकांनी अनुभवली. स्वातंत्र्यदिनी जे विविध कार्यक्रम शहरात पार पडले त्यावेळी या दोघातले मतभेद थेट जाहीरपणे समोर आले होते. आमदार राहुल पाटील यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री व्यासपीठावर असताना खासदार जाधव यांनी शिवसनिकांत व्यासपीठासमोर बसणे पसंत केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत मात्र खासदारांनी पालकमंत्र्यांवर पक्षाच्या व्यासपीठावरून हल्ला चढवला. पालकमंत्री रावते यांनी काही महिन्यांपूर्वी पाथरीत आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या दूध डेअरीला भेट दिली होती. त्याचा संदर्भ देत खासदार जाधव यांनी कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्र्यांना विरोधकांकडे जायला वेळ मिळतो; पण शिवसनिकांसाठी वेळ मिळत नाही, हे दुर्दैवी असल्याचे नमूद केले.

पाथरी नगर परिषदेला भरपूर निधी दिला आहे. विरोधकांना पालकमंत्री बळ देत आहेत. याउलट आम्ही सांगितलेल्या ठिकाणी मात्र जिल्हा नियोजन समितीचा निधी दिला जात नाही, असा आरोप खासदार जाधव यांनी केला. खासदार जाधव यांची पालकमंत्र्यांवरील ही टीका थेट जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष भोयर यांच्या समोरच झाली. दरम्यान शिवसेनेत प्रवेश केलेले आमदार मोहन फड यांनी त्यांच्या मतदारसंघात झालेल्या पक्षाच्या पहिल्याच कार्यक्रमाला दांडी मारली, याचीही चर्चा शिवसनिकांमध्ये सुरू होती.