मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मंगळवारी महाराष्ट्र बंद आणि बुधवारी मुंबई बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये काही ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे मराठा मोर्चा समन्वयक, सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर प्रचंड टीका केली. या साऱ्या टीका आणि चर्चांदरम्यान शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याचे नेतृत्व काढून घेतले जाईल अशी भाजपच्या गोटातच चर्चा आहे, असे विधान त्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आंदोलन पुन्हा तीव्र झाले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जी स्थिती उद्भवली आहे, ती पाहता राज्यात नेतृत्वबदल केला जाईल, अशी चर्चा भाजपमध्येच रंगली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाने बंद पुकारून निषेध नोंदवला. या बंद दरम्यान अनेक ठिकाणी घडलेल्या हिंसक घटनांमुळेही तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीबाबत बोलतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याचे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.

‘महाराष्ट्रात जे चित्र आहे, ते राजकीय नेतृत्वाचे अपयश आहे. त्यातूनच मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे या चर्चा महाराष्ट्रात रंगलेल्या नसून तर भाजपमध्येच रंगलेल्या आहेत, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी मात्र संजय राऊत यांचा दावा फेटाळला. राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. सरकार स्थिर आहे. पक्षातही कोणतीच नाराजी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री बदलणार ही शिवसेनेने पसरवलेली अफवा आहे, असे भांडारी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mp sanjay raut bjp want leadership change
First published on: 26-07-2018 at 04:12 IST