महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांची युतीही झाली आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला आहे. आमचं ठरलंय असं दोन्ही पक्ष ठामपणे सांगत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असं वक्तव्य केलं आहे. मनमाड या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत. मागच्या सोमवारीच भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रभारी सरोज पांडे यांनी भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला होता. ज्यानंतर मुख्यमंत्री आमचाच असा दावा करणारी पोस्टर्स नाशिकमध्ये झळकली. यावरुन निर्माण झालेला वाद कुठे शमतो न शमतो तोच संजय राऊत यांनी ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असं म्हटलं आहे.

शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरेंसोबत संजय राऊतही सहभागी झाले आहेत. ही यात्रा मनमाडमध्ये आली तेव्हा तिथली गर्दी पाहून संजय राऊत यांनी आपल्याला विजयी मेळाव्याला आल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर जन आशीर्वाद यात्रेला जर इतकी गर्दी झाली आहे तर ऑक्टोबर महिन्यात जेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल तेव्हा किती गर्दी होईल असंही वक्तव्य त्यांनी केलं.

युवासेनेने काढलेली जन आशीर्वाद यात्रा मनमाड शहरात आल्यानंतर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला युवा नेता मिळाला असून सर्व धर्माचे लोक त्यांच्याकडे आशेने पाहून महाराष्ट्र नेतृत्त्व करण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे त्यांनी सांगितलं.