दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचं नातं कसं होतं ते संजय राऊत यांनी उलगडून सांगितलं. ते बेळगावमधील प्रगट मुलाखतीमध्ये बोलत होते. बाळासाहेब ठाकरे माझ्यावर सुद्धा चिडायचे. ते बाळासाहेब होते त्यांना चिडण्याचा अधिकार होता असे संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब माझ्यावर चिडले तरी, त्यांनी प्रेम सुद्धा माझ्यावर तितकचं केलं. बाळासाहेबांच्या प्रेमामुळे संजय राऊत आज देशाला दिसला. मी खूप चुका केल्या, पण बाळासाहेबांनी मला संभाळून घेतलं. माझ्या अनेक चुका बाळासाहेबांनी पोटात घातल्या असे संजय राऊत म्हणाले.

सामनाचा संपादक झाल्यानंतर बाळासाहेब मला वेगवेगळया ठिकाणी घेऊन जायचे. तिथे माझी हा माझा फायर ब्राण्ड एडिटर अशी ओळख करुन द्यायचे असे संजय राऊत यांनी सांगितले.

खर्गेंबरोबर आम्ही शुद्ध मराठीत बोलतो
काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी आहेत. ते मूळचे कर्नाटकातील गुलबर्ग्याचे आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात खर्गे यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. आम्ही त्यांच्याबरोबर शुद्ध मराठीतच बोलतो असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

गोगटे रंगमंदिर येथे संजय राऊत यांची प्रगट मुलाखत सुरु आहे. आमच्या मनात खोट नाही, सर्वच आपले आहेत. हे कौरव-पांडवांच युद्ध नाही. ही जमिनीची नाही, संस्कृतीची लढाई आहे असे संजय राऊत बेळगावसंबंधी महाराष्ट्र-कर्नाटकातील संघर्षावर म्हणाले.

कर्नाटकातील अनेक कलावंत, साहित्यिक यांच महाराष्ट्रातील साहित्यामध्ये योगदान आहे. गरीश कर्नाड, भीमसेन जोशी पंडित, रजनीकांत यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.