सतीश कामत, लोकसत्ता
रत्नागिरी  : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीतेश यांनी रविवारी एका कार्यक्रमात कोकणच्या विकासासाठी एक होण्याची दिलेली हाळी म्हणजे भाजपा-सेना युतीची प्रसादचिन्हे आहेत, असे मानणे घाईचे असून ही रंगमंचीय वक्तव्ये बोलाचीच कढी, बोलाचाच भात, या धर्तीची ठरण्याची शक्यता दाट आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वेंगुर्ले येथे बांधण्यात आलेल्या मच्छी मार्केटचे उद्घाटन रविवारी झाले. यावेळी बोलताना, राणेपुत्रांसह खासदार राऊत यांनी, नेहमीप्रमाणे एकमेकांना टोमणे न मारता कोकणच्या विकासासाठी आम्ही सर्व एक, असा नारा दिल्यामुळे लगेच काहीजण पुन्हा युतीची स्वप्ने रंगवू लागले आहेत. स्वत: आमदार नीतेश यांनीही तसा उल्लेख केला. पण त्या कार्यक्रमाला दोन्ही पक्षांची प्रमुख नेते मंडळी एकत्र येण्याचे मुख्य कारण म्हणजे, मागील युती सरकारच्या काळात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या योजनेसाठी निधी आणला आहे. त्यामुळे उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून आपल्या योगदानाचे सर्वांना स्मरण करून देणे, हे त्यांचे राजकीय कर्तव्य होते आणि ते पार पाडत असताना सभासंकेतानुसार आवश्यक सभ्यतेचा भाग म्हणून अशा प्रकारच्या तात्त्विक ऐक्याची हमी दोन्ही बाजूंनी दिली. याशिवाय, जिल्हा परिषद, नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहेत. अशा वेळी, विकासाच्या कामांमध्ये आपण राजकारण आणत नाही, हे दाखवण्याचीही दोन्ही बाजूंना गरज होती.

हे वगळता बाकी पूर्वीप्रमाणे राजकीय पातळीवर एकत्र येऊन युती करणे दोन्ही बाजूंनी संभवत नाही. माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी या संदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये पुन्हा नेहमीप्रमाणे जुने वाद विषय उकरून काढले आहेतच आणि ते स्वाभाविकही आहे. कारण केसरकर असोत, किंवा सेनेचे दुसरे आमदार वैभव नाईक, राणेंना विरोध, हाच त्यांच्या राजकारणाचा पाया राहिला आहे. त्यांच्याव्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील काका कुडाळकर, सतीश सावंत, संजय पडते, शंकर कांबळी इत्यादी एके काळचे राणेंचे जवळचे कार्यकर्ते दुखावल्यामुळे दूर गेले आहेत. आमदार नीतेश यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांंचा नवीन संच तयार केला असल्याने आता राणेंबरोबर राहून राजकीय भवितव्य नाही, हे लक्षात आल्यानेही काही ज्येष्ठ कार्यकर्ते सेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ातही, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि नुकतेच विधानसभा अधिवेशनात तालिका अध्यक्षपद गाजवलेले आमदार भास्कर जाधव या दोघांचे एकमेकांशी सख्य नसले तरी राणेविरोध हे दोघांचे समान राजकीय सूत्र आहे.

भाजपाच्या बाजूने विचार केला तर मुळात माजी आमदार प्रमोद जठार किंवा बाळ माने यांच्यासारखी काही मोजकी मंडळी सोडली तर याच पक्षातील इतर फार कोणी राणेंबरोबर जुळवून घेण्यासाठी मनापासून उत्सुक नाही. आमदार नीतेश कार्यक्रमात म्हणाले तसं, ‘पक्षश्रेष्ठींकडून आज्ञा आल्यामुळे’ त्यांनी राणे पिता-पुत्रांना स्वीकारले आहे. त्याचबरोबर, कोकणातील भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांंना युतीच्या २५ वर्षांंत सेनेच्या स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांकडून नेहमीच दुर्लक्षित केले गेले आहे किंवा दुय्यम वागणूक दिली गेली आहे.

त्यामुळेही अनेकजण पूर्वीपासून दुखावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना पुन्हा सेनेशी युती करणे म्हणजे कोकणात स्वतंत्रपणे संघटित होण्यासाठी गेली दीड-दोन वर्षे चालवलेल्या प्रयत्नांवर पाणी ओतल्यासारखे होईल, अशी या जुन्या निष्ठावंतांची भावना आहे.

अर्थात, राजकारण म्हणजे सर्व प्रकारच्या शक्यतांचा खेळ असतो. हे कौशल्य साधले तरच ते यशस्वी होते. पण तूर्तास तरी उद्धव आणि राज एकत्र येतील का, या प्रश्नासारखाच पुन्हा युती होईल का, हा नेहमी विचारण्याचा आणि आपणच आंतरिक इच्छेनुसार उत्तर देण्याचा प्रश्न झाला आहे.