22 September 2020

News Flash

शिवसेनेने आंदोलन जरूर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही? याचं उत्तर द्यावं : शेलार

पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का?, असा प्रश्नही केला.

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याचे समोर येताच, राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. या मुद्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेने पुण्यात या घटनेवरून कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केल्यानंतर, आता भाजपा नेते  आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मनगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसविलाच पाहिजे! पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का?” असा प्रश्न शेलार यांनी शिवसेनेला केला आहे.

“कर्नाटकातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवणं याचा आम्ही निषेधच करतो. या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या देशामध्ये, अखंड हिदुस्थानमध्ये कधीही कोणी करता कामा नये, जो होऊ आम्ही देणारही नाही. या सगळ्या घटनाक्रमाच्या मागे स्थानिक काँग्रेस आमदार सतीष जारकीहोळी यांनी घेतलेली भूमिका ही थेट आहे, या पुतळ्याला हटवण्याची आहे. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष असलेल्या या जारकीहोळींच्या विरोधात संजय राऊत तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का? सवाल आमचा तुम्हाला आहे. आंदोलन छत्रपतींसाठी करायला लागलं तर त्यासाठी परवानगीची गरज काय? शिवसेनेला विरोधीपक्ष नेता व भाजपाच्या परवानगीची गरज का लागते? या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हालाच द्यावं लागेल. त्यामुळे छत्रपती शिवजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी सन्मानाने, जसं तहसीलदार आणि पोलीस पाटील यांनी सांगितलं. त्या पद्धतीनेच झाला पाहिजे, कर्नाटक सरकारला आमची विनंती आहे. शिवसेनेने आंदोलन जरूर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही याचं उत्तर द्यावं.” असं शेलार यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे म्हटलं आहे.

या अगोदर  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर मनगुत्ती येथील पुतळा प्रकरणावरुन निशाणा साधला.   “बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटकातील भाजपा सरकारने हटवला याचा मी तीव्र निषेध करतो. कर्नाटक सरकारने हा पुतळा पुन्हा मूळ जागी सन्मानाने बसवावा,” असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच ट्विटच्या शेवटी त्यांनी, “महापुरुषांचे विचार जपण्याची गरज असते. त्यांचा अवमान केलेला कोणीही खपवून घेणार नाही,” असा इशाराही दिला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. काल रात्री अश्वारूढ पुतळा काढण्यात आल्याने मराठी भाषिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. कन्नाडीगांच्या दबावामुळे हे कृत्य केल्याची सांगितले जात आहे. मात्र आता या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे.

काय घडलं?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निपाणी हे एकीकरण लढ्याचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. निपाणीपासून जवळ असलेल्या मनगुत्ती गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा बसवताना रीतसर परवानगी घेण्यात आली होती. या पुतळ्यासाठी चौथऱ्याचे काम पूर्ण झाले होते. या चौथऱ्यावर त्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तो काढून टाकावा असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्याला विरोध करण्यासाठी मनगुत्ती येथील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर मोठ्या बंदोबस्तात आलेल्या पोलिसांनी रातोरात या ठिकाणी येऊन हा पुतळा हटवला. त्यानंतर सीमा भागातून कन्नाडीगांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 6:03 pm

Web Title: shiv sena must agitate will it do it against congress or not give answer this shelar msr 87
Next Stories
1 “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेणार नाही”; राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजपावर टीका
2 नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, गुलाबराव पाटील यांची बोचरी टीका
3 “वृत्तवाहिनीवर मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख ऐकून शरद पवारांनी मला फोन केला अन्…”
Just Now!
X