मुंबईत मंगळवारी शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या नव्या शिलेदारांची घोषणा होत असताना औरंगाबादमध्ये मात्र जुने शिवसैनिक मात्र नवा डाव मांडत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केल्यापासून हे शिवसैनिक पक्षासाठी काम करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाच्या मराठवाड्याच्या भूमिकेविषयी नाराज होते. सध्या शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारापासून फारकत घेतली आहे, असा त्यांचा आक्षेप होता. त्यामुळेच या शिवसैनिकांना मंगळवारी ‘मराठवाडा विकास सेना’ या नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली.

औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून बाळासाहेबांच्या फोटो समोर मराठवाड्याच्या विकासासाठी ‘मराठवाडा विकास सेनेचा’ झेंडा खांद्यावर घेत आहोत, अशी शपथ यावेळी घेण्यात आली. चला, मागासलेपणाचा कलंक हटवू, असा नारा पक्षाचे संस्थापक सुभाष पाटील यांनी दिला. त्याला प्रतिसाद देत आज अनेक कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अपुरा निधी यामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला असून तो अनुशेष भरून निघायला हवा. समतोल विकासासाठी कोणतीही ठोस उपाय योजना झाली नाही. तो साधण्यासाठी महाराष्ट्राचे तुकडे होऊ नये, अशी समंजस भूमिका घेऊन विकासाची लढाई लढणार असल्याचं सुभाष पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी पुरेशी नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी सरसकट कर्जमाफी करावी. कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे हताश झाला आहे. त्याची योग्य दखल घेऊन मदत करावी. शेतीमालाला हमीभाव, मोफत वीज, शेतकऱ्यांच्या मुलांना वसतीगृह उपलब्ध करावा. मराठवाड्याचा रणजी दर्जाचा स्वतंत्र संघ स्थापन करा. तसेच औरंगाबाद महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटला असून महानगरपालिका बरखास्त करा. पर्यटनाला चालना द्यावी, रस्ते खडे मुक्त करावे.असे विविध मुद्दे यावेळी मांडण्यात आले.

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कारभारावर यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ‘बेटी बचाव, मराठवाडा बचाव’ अशी घोषणा देणारे फलकही यावेळी मोर्चेकरांच्या हातात होते. पक्ष स्थापनेनंतर क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आलS. मराठवाड्याच्या विकासासाठी काम करू असा निर्धार मराठवाडा विकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.