महायुती आणि आघाडीमधील वाटाघाटी संभ्रमात असताना दापोली मतदारसंघात सर्वच पक्षांत सध्या चढाओढीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या २५ वर्षांत शिवसेनेने मिळवलेल्या निर्विवाद वर्चस्वाला भेदण्यास ही राजकीय परिस्थिती पोषक असल्याने आता प्रत्येक विरोधी पक्षाचे संभाव्य उमेदवार व त्यांचे कार्यकत्रे जोरदार तयारीला लागले आहेत. साहजिकच यंदाची विधानसभा निवडणूक सप्तरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेले पंधरा दिवस पितृपक्षामुळे शांत असलेले राजकीय वातावरण मंगळवारपासून पुन्हा तापण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सर्व पक्षांचे लक्ष महायुती आणि आघाडीच्या वाटाघाटींकडे होते. या वाटाघाटी अजूनही यशस्वी झालेल्या नाहीत; पण त्यातही महायुती तुटण्याच्याच बेतात आहे. याचा फटका महायुतीतील सर्वच पक्षांना बसणार हे निश्चित आहे. दापोलीसारख्या बालेकिल्ल्यात तर शिवसेनेसाठी भाजपची अशी कुरघोडी नुकसानीची ठरणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिवसेनेच्या या मतदारसंघात भाजप नेत्यांनी बंडखोरी करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. पण शिवसेनेला त्यामुळे जास्त नुकसान होण्याची शक्यता नव्हती. मात्र भाजप आता शिवसेनेला थेट आव्हान देण्याच्या तयारीत असल्याने शिवसेना विरोधकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. ही परिस्थिती स्वत:चे राजकीय आस्तित्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाला फायदेशीर ठरणार आहे.
मुळात वाटाघाटीबाबत परस्परांना ताणून धरण्याचे प्रकार दर वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वाटय़ाला येतात. त्यामुळे दापोलीत काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद आतापर्यंत कधीच एकत्र राहिली नाही. यंदाही आघाडीपाठोपाठ महायुतीलाही मतभेदांचे ग्रहण लागल्याने काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेचे मोठय़ा प्रमाणात मतविभाजन होईल, असा अंदाज आहे. दुसऱ्या बाजूला गेली २५ वष्रे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात बदल घडवण्याबाबत झालेली जनजागृती यंदा शिवसेनाविरोधकांना आश्वासक वाटू लागली आहे. साहजिकच काँग्रेस आघाडीत दर वेळी उफाळून येणारे अधिकृत व बंडखोर उमेदवाराचे आस्तित्व यंदाही कायम राहणार असले तरी यावेळी शिवसेनेला कांटे की टक्करला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
दापोलीच्या िरगणात मनसेसह यंदा कुणबी सेनेचे उमेदवारही निवडणूक लढवणार आहेत. हे दोन्ही उमेदवार मोठय़ा प्रमाणात मतविभाजनास कारणीभूत ठरतील. त्यात मनसे खेडमधील व्होटबँकेवर सर्वाधिक अवलंबून असली तरी त्यांना शिवसेनेतील असंतुष्ट गटांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला समाजाच्या प्रश्नांबाबत दुर्लक्ष झाल्याच्या नाराजीवरून कुणबी सेनेनेही आपली ताकद दाखवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेला पर्याय म्हणून पुढे येणारे उमेदवार दर वेळी याच नाराज सामाजिक व्होटबँकेवर लक्ष ठेवून असतात. मात्र कुणबी सेनेची उमेदवारी त्यांच्या या अपेक्षांवर पाणी पाडणारी ठरेल. गेल्या काही निवडणुकीत बसपचाही उमेदवार आपला खारीचा वाटा उचलत आलेला आहे. हे मामुली वाटणारे शक्तिप्रदर्शन करून स्वत:चे आस्तित्व दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न या मतदारसंघात अविरत सुरू आहे.
यंदाही ते या धोरणाचाच अंगीकार करणार हे निश्चित. साहजिकच शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांचा अधिकृत वा बंडखोर उमेदवार, तसेच मनसे, कुणबी सेना आणि बसप यांच्यासह दापोलीचे िरगण यंदा सप्तरंगी होण्याचे संकेत आहेत. साहजिकच विधानसभा निवडणुकीच्या या सप्तरंगी िरगणात कोणत्याही उमेदवाराकडून लोकसभेप्रमाणे निसटत्या विजयाचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.