दहशतवाद्यांना धर्म नसतो असे आपण म्हणतो. मग अशा वेळी हिंदू दहशतवाद, शहरी नक्षलवाद असा शब्द प्रयोग का केला जातो. देशातही हिंदुत्ववाद्यांचे सरकर असतानाच हिंदू दहशतवादी का निर्माण होत आहेत, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील रंगशारदा येथे पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांना नक्षलवादाप्रकरणी विचारवंतांवर आणि हिंदू कट्टरपंथीयांवर झालेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, कोर्टात केस होण्याच्या अगोदरच पोलिसांकडून पत्रकार परिषदेत तपशील उघड करण्याचा नवीन प्रकार सुरु झाला आहे. शहरी नक्षलवाद, हिंदू आंतकवादी हे शब्द प्रयोग का केले जातात आणि यात भाजपा सरकारच्या काळातच या सर्वांना का सक्रीय व्हावे लागले ?. देशात हिंदुत्ववाद्यांचे सरकार आहे मग तरीही हिंदू दहशतवादी का तयार होत आहेत?, असा सवाल त्यांनी विचारला. गुन्हेगारांना पाठिशी घाला अशी आमची भूमिका नाही. पण आधी पोलिसांनी कोर्टात पुरावे सादर करावे, असे त्यांनी सांगितले.

नोटाबंदी ही चूक होते, हे भाजपा सरकार कधी मान्य करणार. देशात पुन्हा नोटाबंदी केली तर अराजकच निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले. महागाई आहेच, पण त्याचा विरोध आम्ही सत्तेत राहून करतच आहोत, रघुराम राजन हे चुकीचे होते मग त्यांना परत बोलवण्यासाठी प्रयत्न का सुरू आहेत?, असा सवाल त्यांनी विचारला.