वयाच्या ७० व्या वर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न होता. २००० साली १९९२- ९३ मधील अग्रलेखावरुन त्यांना अटक करण्याचे प्रयत्न होते. पण ती रोखण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. मग तेव्हा बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे होती, असा सवालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. मी चोरुनही मुलाखत बघितली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्ध ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी मुलाखत घेतली. यात शरद पवारांनी आर्थिक निकषावरील आरक्षण, बाळासाहेब ठाकरे, राजकारण अशा विविध विषयांवर भाष्य केले होते. या मुलाखतीबाबात उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारले असता ते म्हणाले,  मी खरं तर चोरुनही ती मुलाखत बघितली नाही. जातीय आरक्षणाऐवजी आर्थिक निकषावर आधारित आरक्षण द्या अशी बाळासाहेबांची ५० वर्षांपूर्वीची भूमिका होती.  प्रत्येक जातीत पोट असते, पण आता जातीवर पोट आणू नका, असे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. ही भूमिका समजायला शरद पवारांना ५० वर्ष लागली, असा चिमटा त्यांनी काढला.

शिवसेनाप्रमुखांनी घेतलेली भूमिका त्याच वेळी स्वीकारली असती तर आज समाजात जातीपातीच्या भिंती उभ्या राहिल्या नसत्या. मराठी माणूस आज एकत्र असता, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. शरद पवारांच्या विदर्भाबाबतच्या भूमिकेवर ठाकरे म्हणाले, शरद पवार सामना वाचत असावेत. आम्ही देखील हेच म्हटले आहे. विदर्भातील मराठी माणसाला स्वतंत्र राज्य नको आहे.

नीरव मोदीबाबतही त्यांनी भाष्य केले. नीरव मोदीप्रकरणानंतर देशातील जनतेत बँकांबद्दल संशयाचे वातावरण आहे. बँक बुडवली जात असून यामुळे लोकांनी कष्टाने जमा केलेले पैसेही बुडतात. आता सरकारने बँकेतील पैशांचीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार पंतप्रधान व अर्थमंत्र्यांची भेट घेतील, असे त्यांनी सांगितले. राजकारणात बाळासाहेब ठाकरेंनी जे केले ते उघडपणे केले, त्यांनी कधी पाठीत वार केला नाही, असेही त्यांनी नमूद केले.