शिवसेना पक्षप्रमुख आज औरंगाबादमध्ये; कचऱ्याचा मुद्दा केंद्रस्थानी?

नारेगावमध्ये २० लाख टन कचऱ्याचा डोंगर. साठलेल्या घाणीमुळे अमानवीय वागणूक देणाऱ्या महापालिकेच्या विरोधात असंतोष संघटीत होत गेला. हिंसाचार झाला. त्यातही पोलिसांनी अत्याचार केला. प्रत्येक बाब राज्यस्तरीय नेत्यांपर्यंत पोहचली. मग शासनही जागे झाले. त्यांनी ८८ कोटी रुपये मंजूर केले. पण कचऱ्याचा प्रश्न काही अजूनही सुटला नाही. गल्लोगल्ली शिवसेनेच्या महापौरांना प्रश्न विचारले जात आहेत. अशा वातावारणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी १९ व २० एप्रिल रोजी औरंगाबाद येथे  येणार आहेत. ठाकरे यांच्या आगमनाच्या पाश्र्वभूमीवर बोलताना औरंगाबाद कनेक्ट टीमच्या वतीने साहित्यिक श्रीकांत उमरीकर म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांचे कचरानगरीमध्ये स्वागत आहे. त्यांच्या मावळय़ांनी औरंगाबादमध्ये नवी कचरा पर्यटनाची स्थळे निर्माण केली आहेत. ती त्यांनी जरुर पहावीत आणि लोकसभा मतदारसंघ बांधावा.’

औरंगाबाद शिवसेनेचा बाल्लेकिल्ला. सलग पाच वेळा लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याची किमया चंद्रकांत खरे यांना करता आली. गेल्या वेळी खासदार खरे यांना नाराजीचा सामना करावा लागला असता पण ‘नमो’ प्रचार वादळात खरे पुन्हा निवडून आले. पण त्यानंतरही त्यांना सेनेतील गटबाजीला थांबवता आले नाही. त्यातून कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आता लोकसभेचा उमेदवार बदलावा, अशी मागणी थेट माध्यमांकडे केली. उमेदवार बदलावा, अशी मागणी शिवसेनेमध्ये जाहीरपणे होण्याची ही पहिलीच वेळ असावी. पालकमंत्री दीपक सावंत यांचे व खासदार खैरेंचेही बिनसल्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री सावंत मागील आठवडय़ात शहीद किरण थोरात यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी औरंगाबादेत आले आणि विमानतळावरूनच परतले. तेव्हाच सावंत हे काहीसे नाराज असल्याचा संदेश गेला. रामदास कदम यांच्यासोबत खासदार खैरे यांचे काही जमले नाही. कदम यांनी खैरे पाठपुरावा करीत असलेल्या योजनांमध्ये खोडा घालण्यास सुरुवात केली. खैरे यांनी पक्षश्रेष्ठींना कदम यांचे औरंगाबादचे पालकमंत्रीपद काढून घ्यायला पाडले होते. आता अवघ्या दोन-अडीच महिन्यांतच पुन्हा पालकमंत्री सावंत व खासदार खैरे यांच्यात नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

नाराजीची चिंता

शिवसेनेतील अंतर्गत नाराजी, त्याच अपयशाचा कचऱ्याचा डोंगर, स्मार्ट सिटीमध्ये रक्कम येऊन न झालेला विकास, रस्ते बांधणीचे पडून असणारे पैसे ही महापालिकेची ‘कामगिरी’ असल्याने उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघ बांधण्यासाठी पुन्हा एकदा जुन्याच हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर लक्ष्य केंद्रीत करावे लागेल, असे सांगण्यात येत आहे. नाराजीत भर टाकणाऱ्या घडामोडींना शहरात भर टाकणाऱ्या कचऱ्यामुळे आणखीनच गुंता वाढवलेला आहे. शहराची कचऱ्याची समस्या मिटवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही कानमंत्र देतात का, ठाकरे कचऱ्याच्या प्रश्नाचा किती गंभीरतेने आढावा घेतात किंवा ते येऊन गेल्यानंतर कचऱ्याच्या स्थितीत काही सुधारणा होते का, शिवाय हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचा लोकसभेचा उमेदवारच बदलावा, या हर्षवर्धन जाधव यांनी पक्षप्रमुख येण्याच्या तोंडावरच केलेल्या मागणीकडे कानाडोळा केला जाईल, असे खरे समर्थक सांगत आहेत.

असा आहे मतदारसंघाचा इतिहास

१९७७ साली बापूसाहेब काळदाते यांनी औरंगाबादचे खासदार म्हणून नेतृत्त्व केले. तेव्हा त्यांना मिळालेल्या मताच्या ५६.४७ शेकडा मते मिळाली. काझी सलीम यांनी साहेबराव पाटील डोणगावकर यांचा १९८० मध्ये पराभव केला. त्यांनतरच्या म्हणजे १९८४ च्या निवडणुकीमध्ये साहेबराव पाटील विजयी झाले. तेव्हा त्यांना एकूण मताच्या ५१.६ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर मात्र मोरेश्वर सावे यांच्या रुपाने शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेला. ते १९८९ व १९९१ च्या निवडणुकीमध्ये विजयी झाले. त्यानंतर प्रदीप जैस्वाल यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. ते विजयी झाले. मात्र, १९९८ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामकृष्णबाबा पाटील यांनी विजय मिळविला. काँग्रेसला मिळालेले हे यश पुढे टिकवता आले नाही. त्यानंतर १९९९ मध्ये खासदार चंद्रकांत खरे यांचा औरंगाबाद मतदारसंघावर प्रभाव राहिला. त्यानंतरच्या तीन वेळा ते निवडून आले. आता पुन्हा ते रिंगणात उभारण्याच्या तयारीत असताना शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आले आहेत. विकासाचा कचरा रस्तोरस्ती दिसत आहे. त्यामुळे उद्याच्या आढावा बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कसा आणि कोणता पवित्रा घेतात, याचे औत्सुक्य वाढले आहे.