राज्यातील जनता तडतफडते, तळमळते, विव्हळते, त्यांच्या आक्रोशाकडे आणि शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत मांडतानाच मुख्यमंत्रीपद हे माझे स्वप्न नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहे. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर मी राजकारणात असलो किंवा नसलो तरी काहीच फरक पडत नाही, असेही ते म्हणालेत.

शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्याला सुरुवात केली. नेसरीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. कर्नाटकमध्ये राहणाऱ्यांना कन्नड भाषा आलीच पाहिजे, असे तिकडचे मुख्यमंत्री सांगतात. पण महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आले पाहिजे, अशी खमकी भूमिका घेणारा मुख्यमंत्री राज्याला अजूनही लाभला नाही. असा मुख्यमंत्री मला राज्याला द्यायचा आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना दुतोंडी नाही. सरकार म्हणून आमच्याकडे अधिकार आहेत यातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही तर त्या सत्तेला लाथ मारुन जाणार, अशी गर्जनाही त्यांनी केली.

सरकारने असे काम केले पाहिजे की त्यांच्यावर जाहिरातबाजीची वेळ यायला नको. जनता ही लाभार्थी नाही ते आपले दैवत आहे. जनतेचे काम करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेले आहे, असा चिमटा त्यांनी भाजपला काढला. लोकांच्या हालअपेष्टा संपलेल्या नाही, पण सरकारची जाहिरातबाजी सुरु आहे, याऐवजी सरकारने सिंचन प्रकल्पांवर खर्च करावा, असे त्यांनी सांगितले. योग्य शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेल असे भाजपचे नेते सांगतात. हल्ली भाजपची शेतीही ऑनलाईन होते, असा टोला त्यांनी लगावला. निवडणूक आल्यावर भाजपला शिवाजी महाराजांची आठवण येते, असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची मुंबईत गुप्त भेट झाली. त्या दोघांमध्ये शेतकरी किंवा राज्याशी संबंधित विषयावर नव्हे तर मुंबई क्रिकेट असोसिएशनबाबत चर्चा झाली, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. शेतकऱ्याला सरकारचे उपकार नकोत. विजय मल्ल्यासारखी लोकं पळण्यापूर्वीच त्यांना पकडत नाही. पण शेतकऱ्यांने २०- २५ हजार रुपये थकवले तरी त्यांना नोटीस पाठवली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.