दिल्लीत बसून पाकिस्तानवर डोळा वटारणे सोपे. पण पाक ही चीनची ढाल आहे. आपण ढालीवर दंडुके आपटत असून चीनची तलवार म्यान करण्यात अपयशी ठरलो असे सांगत शिवसेनेने मोदी सरकारवर तोंडसुख घेतले. पतंग हवेत उडतात, युद्ध जमिनीवरच होते, असा चिमटाही सेनेने काढला आहे.

भारत आणि चीन यांच्यातील डोकलामचा तिढा पाच महिन्यांपूर्वीच सुटल्याचे सांगितले जात असतानाच डोकलाम तिठ्याचा उत्तर भाग चिनी सैन्याने पूर्णपणे ताब्यात घेतल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना आपनू गुजरात दाखवत असतानाच चीनने खरे रंग दाखवायला सुरुवात केली. डोकलाममध्ये सात हेलिपॅडसह मोठ्या प्रमाणात चिलखती वाहने पोहोचली आहेत. दोन-चार महिन्यांपूर्वी चीनने माघार घेण्याचा बनाव रचला. दोन पावले माघार घेत चीनने आता दहा पावले धडक मारल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोकलाम वाद किती शांतपणे संपवला पाहा, काँग्रेसच्या राजवटीत असे कधी घडले नव्हते. या वैचारिक पतंगबाजीचा मांजा लाल माकडांनी कापला आणि सीमेवरून धोक्याची घंटा वाजवली. पण आमच्या राज्यकर्त्यांचा कानात घंटेचा आवाज घुमेल का? असा प्रश्न अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. पाकिस्तानवर दिल्लीत बसून डोळा वटारणे आणि पाकिस्तानचा वापर गुजरातसारख्या राज्यांच्या निवडणुकीत करून घेणे सोपे आहे, असा चिमटा त्यांनी काढला.