जीएसटी संदर्भात शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. महापालिकेला लाचार होऊन केंद्र आणि राज्य सरकार दरबारी जाण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला विचार करावा लागेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. महापालिकेची स्वायत्तता कायम राहावी असेही त्यांनी म्हटले आहे.

जीएसटी संदर्भात शिवसेना भवनात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, जीएसटीमुळे मुंबई महापालिकेला जकातच्या माध्यमातून मिळणारा महसूल बंद होणार आहे. जीएसटीतून केंद्र सरकारकडून येणारा निधी राज्य सरकारने थेट महापालिकेला देण्याची गरज आहे. यासंदर्भात जीएसटी अधिवेशनात पाठपुरावा करु असे त्यांनी सांगितले.

जकातनाक्यामुळे प्रत्येक नाक्यावर गाड्याची तपासणी होत होती. त्यामुळे सुरक्षाही राखली जात होती. आता जीएसटीमुळे जकात बंद होणार असल्याने सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्नही शिवसेनेच्या बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जीएसटीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

शिवसेनेने राज्यातील पक्षाची बांधणी मजबूत करण्याची तयारीही सुरु केली आहे. राज्यात शिवसंपर्क अभियान राबवले जाणार असून पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात हे अभियान राबवले जाईल. यानंतर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागांमध्ये हे अभियान राबवण्याचा निर्णय सेनेने घेतला आहे. ७ मे रोजी उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असून या या सभेत संपर्क अभियानात सहभागी झालेले आमदार आणि खासदार पक्षप्रमुखांना ग्राऊंड रिपोर्ट सादर करणार आहेत.