पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून हल्ला केल्याच्या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. आता मोदींनी ‘मन की बात’ बंद करुन गन की बात करावी असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबईत रंगशारदामध्ये शिवसेनेचा प्रशिक्षण मेळावा असून या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी जम्मू काश्मीरमधील घटनेवर प्रतिक्रिया दिली. काश्मीर पेटलेला आहे. मोदींनी आता गन की बात केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील पूंछमधील किरपान येथे पाकिस्तानच्या बॅट तुकडीने भारतीय जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. पाकच्या सैनिकांनी भारतीय जवानांचे शिर कापण्याचा नृशंस प्रकार केला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
मुंबई महापालिकेवरुनही उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. आम्ही महापालिकेचे राखणदार असे काही जण म्हणतात. पण नुसता दांडा आपटून जागते रहो म्हणणाऱ्या पहारेकऱ्यांना अर्थ नाही अशा शब्दात ठाकरेंनी भाजपची खिल्ली उडवली. विकास आराखड्यावरुन त्यांनी भाजपवर टीका केली. त्यांना कागदावरची मुंबई माहित असून आपल्याला तळागाळातील मुंबई माहित आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला. मेट्रोसाठी स्थानक कुठे आहेत हे दाखवतात. तसेच या प्रकल्पातील बाधित रहिवाशांचे पुनर्विकास कुठे आणि कसा करणार हेदेखील दाखवा असे सांगत त्यांनी आरेमधील कारशेडला विरोध दर्शवला. आरेऐवजी कांजूरमार्गला मेट्रो कारशेड करता येईल. पण त्यासाठी १८०० कोटी खर्च अपेक्षित आहे. मुंबईतून २ लाख कोटी रुपयांचा कर जमा होत असताना शहरासाठी १८०० कोटी खर्च करता येणार नाही का असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. महापौर आणि अन्य नगरसेवकांनी वेळेवर महापालिकेत यावे असे निर्देशही त्यांनी या मेळाव्यात दिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2017 9:15 pm