राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या १२ रिक्त जागांपैकी एका जागेवर बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिवसेनेकडून शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोंडकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. त्याला मातोंडकर यांनीही होकार दिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ही माहिती दिली.

महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी १२ जणांच्या नावांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली आहे. यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उर्मिला मातोंडकर यांची निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून मातोंडकर यांना उमेदावारी देण्यात येईल अशी चर्चा होती. दरम्यान, राऊत यांनी सांगितलं की, त्यांनी यापूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मातोंडकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

गुरुवारी राज्य मंत्रिमंडळानं विधान परिषदेच्या जागांसाठी १२ उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही नावे राज्यपालांकडे पाठवली. सरकारमधील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीनही पक्षांनी प्रत्येकी चार नावांची शिफारस केल्याचे सुत्रांकडून कळते.