बदनामी केल्याचा गोगावलेंचा आरोप
चवदार तळ्याच्या कथित जलशुद्धीकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिवसेना आ. भरत गोगावले यांनी शनिवारी महाडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. चुकीचा संदेश पसरवून बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी या वेळी त्यांनी केली.
स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या जलजागृती कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी चवदार तळ्याच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. या घटनेचा विपर्यास करून काही जणांनी समाजमाध्यमांमध्ये बदनामी केली. शासनाचा कार्यक्रम असताना आपल्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. जलपूजनाच्या कार्यक्रमाला जलशुद्धीकरणाचे स्वरूप देऊन हे संदेश पसरवण्यात आले. हे षड्यंत्र करणाऱ्या विरोधकांवर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.
महाडचे चवदार तळे आमच्यासाठी अस्मितेचे प्रतीक आहे. त्याचे पूजन आम्ही केले, जातीपातीचे राजकारण मी केले नाही. त्यामुळे महाड मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे. महाडमध्ये आठ बौद्धविहारांच्या बांधकामांसाठी मी निधी दिला. जे माझ्यावर आरोप करत आहेत त्यांनी चवदार तळ्याचे दर्शन तरी घेतले होते का? असा सवाल त्यांनी केला.
येत्या १४ तारखेला बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला आपण हजेरी लावणार असल्याचेही गोगावले यांनी स्पष्ट केले. या वेळी मोठय़ा संख्येने शिवसनिक उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.