त्रिपुरातील भाजपाच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावणारे सुनील देवधर यांचे शिवसेनेने भरभरुन कौतुक केले आहे. त्रिपुरात भाजपाला विजय प्राप्त करुन देणाऱ्या सुनील देवधर यांचा आम्हाला कौतुक आणि अभिमान असून त्रिपुरातील विजय हा वाळवंटातून ‘केशरा’चे पंचवीस मण पीक काढल्यासारखे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

गेल्या २५ वर्षांपासून डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुराच्या लाल किल्ल्यामध्ये भाजपाने भगवा फडकवला. भाजपाच्या या विजयात महाराष्ट्रातील सुनील देवधर यांचे मोलाचे योगदान आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देवधर यांचे भरभरुन कौतुक करण्यात आले. ईशान्येकडील राज्यांकडे काँग्रेसने कधीच गांभीर्याने पाहिले नव्हते. त्यामुळे ईशान्येतील सत्ता परिवर्तन महत्त्वाचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

सुनील देवधर आणि त्यांच्या टीमने अफाट मेहनत घेतली. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून मराठी सुभेदार सुनील देवधर यांनी त्रिपुरातील बंजर जमिनीत जे पेरले ते आता उगवले. हा विजय सभा, भाषणे किंवा थापेबाजीमुळे नव्हे तर देवधर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच मिळाला, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले.

त्रिपुरात भाजपचा एक तरी आमदार निवडून येईल का, अशी शंका असताना देवधर यांनी भाजपाचे सरकार आणले. मेघालय व नागालँडमध्ये भाजपाने विजयासाठी झोकून दिले. पण त्रिपुरात देवधर यांनी एकाकी खिंड लढवली. ‘त्रिपुरा’तील भाजपा विजय हा उत्तर प्रदेश व गुजरात विजयापेक्षा मोठा असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

भाजपाला विजय प्राप्त करून देणारी फक्त दोनच माणसे आतापर्यंत देशाला माहीत होती. मात्र, १० कोटी सदस्य संख्या असलेल्या या पक्षात विजय प्राप्त करून देणारे फक्त दोघेच नसून ‘तिसरा’ आदमीसुद्धा आहे. ईशान्येमध्ये साजऱ्या झालेल्या ‘त्रिपुरी’ पौर्णिमेचे हेच महत्त्व असून ‘तिसऱ्या’ आदमीचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे, असे सांगत शिवसेनेने देवधर यांचे कौतुक केले आहे.

६० सदस्यीय त्रिपुरा विधानसभेत भाजपाला ३५ तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या इंडिजिनियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराला आठ जागा मिळाल्या. तर डाव्यांचा गड असलेल्या माकपाला फक्त १६ जागाच जिंकता आल्या.