नागपुरातील कार्यक्रमात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात भूमिका मांडून वादाला तोंड फोडले. या वादाचे कवित्व कायम असून विधान परिषदेपाठोपाठ विधानसभेतही त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली. शिवसेना आमदारांनी सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यासंबंधी मुख्यमंत्री निवेदन करतील, अशी सूचना अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहातील कामकाजाची गाडी रूळावर आणली.
शिवसेनेने परिषदेत अणे यांना पदमुक्त करण्याची मागणी केली होती. सभेतही शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अणे यांनी सभागृहाची माफी मागावी नाही, तर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. अणे कुटुंबीय हे वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेतील आहेत. मात्र, ते राज्याचे महाधिवक्ता आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याने त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, असे सरनाईक म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या या मुद्यामुळे विधानसभेतही भाजपा वेगळे पडल्याचे चित्र स्पष्ट होते. नागपूर श्रमिक पत्रकार संघाने पाच डिसेंबरला ‘विदर्भ गाथा’ या श्रीहरी अणे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आयोजित केले होते. त्यात बोलताना संयुक्त महाराष्ट्रासाठी १०६ लोकांचे बळी गेले नाहीत, तर महाराष्ट्रात मुंबई समाविष्ट करण्यासाठी हे बळी गेल्याचा पुनरुच्चार अणे यांनी करून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा आलाप आजही आळवला. मागील सरकारच्या वेळी महाधिवक्ता खंबाटा यांच्याविरोधात हक्कभंग मांडल्याची आठवण सरनाईक यांनी करून दिली.