जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेतर्फे आयोजित आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी लागू केलेला जमावबंदी आदेश मोडून मोर्चा काढण्याचा चंग सेनेच्या नेत्यांनी बांधला आहे.
राजापूर तालुक्यातील माडबन येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेनेने आज (१९ मार्च) भारतीय अणुऊर्जा महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. सेनेचे आमदार उदय सामंत, राजन साळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. कार्यालयाचे कामकाज बंद पाडण्याचा इरादा सेनानेत्यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. या पाश्र्वभूमीवर अणुऊर्जा महामंडळाचे कुवारबाव येथील विभागीय कार्यालय, माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्प परिसर, नाटे पोलीस ठाणे परिसर, तसेच राजापूर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज मध्यरात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
सेनेने यापूर्वी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे हा आदेश जारी केला असल्याचे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे. प्रत्यक्षात सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर तसा एकही प्रकार जिल्हय़ात घडलेला नाही; पण मोर्चावर नियंत्रण ठेवण्याऐवजी प्रशासनाने थेट जमावबंदीचा सोयीस्कर मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे सेनानेत्यांना हा आदेश मोडून मोर्चा काढावा लागणार आहे.