राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगलीच सुंदोपसुंदी सुरु असते. एकेकाळी राजकारणात जवळचे मित्र म्हणून ओळख असलेल्या दोन्ही पक्षांमध्ये सध्या सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी द्वंद्व सुरु असतं. राज्यात विरोधी पक्षांत असलेल्या भाजपाने गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारला टीकेच्या धारेवर धरलं आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशी, राम मंदिर यासारख्या मुद्द्यांवर भाजपा सातत्याने शिवसेनेवर टीका करत आहे.

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि सामना या वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी एक सूचक ट्विट करत विरोधकांना इशारा दिला आहे. राज कुमार यांचा एक डायलॉग मला आजही आठवतोय…काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी इतरांच्या घरावर दगड मारायचा नसतो असं म्हणत राऊतांनी नाव न घेता भाजपासह विरोधी पक्षांना इशारा दिला आहे.

राम मंदिर भूमिपूजनाविषयी उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य, राज्यात करोनाची वाढती रुग्णसंख्या, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीसांचा तपास यामुळे गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारला सातत्याने टीका सहन करावी लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नसल्याचीही टीका विरोधकांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सूचक शब्दांत शिवसेनेची भूमिका मांडली आहे. त्यामुळे राऊतांच्या टीकेला विरोधी पक्ष काय प्रत्युत्तर देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.