20 September 2020

News Flash

“मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटतेय का?;” शिवसेनेचा सवाल

पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे असंही त्यांनी म्हटलं आहे.

प्रदेश भाजपानं ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ हाती घेतलं आहे. या आंदोलनावरून शिवसेनेनं आता विरोधकांवर निशाणा साधला आहे. “ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा, असे सांगण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही. करोनाच्या निमित्तानं राज्यात नवे प्रश्न निर्माण झाले. राज्यपालांच्या ‘अंगणात’ लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटत आहे की त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे?” असा सवाल करत शिवसेनेनं भाजपावर हल्लाबोल केला.

दरम्यान, शिवसेनेनं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील टीका केली. “पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण विरोधकांत शहाणपण उरले आहे काय?” असा सवालही शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

काय म्हटलंय अग्रलेखात ?

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ‘ठाकरे सरकार’विरुद्ध आंदोलन पुकारले आहे. सारा देश करोनाविरुद्ध लढ्यात झोकून देऊन काम करीत असताना महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत. ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ अशा प्रकारचे बारसे या आंदोलनाचे झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून या मंडळींना महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र भाजपचा आदेश आहे की सर्वच काळे करा. हा सर्वच प्रकार म्हणजे येड्यांची जत्रा आहे.

महाराष्ट्राचे अंगण स्वच्छ आहे व करोना योद्धे रणांगणात लढत आहेत. देशात आरोग्यविषयक आणीबाणी आहे. महाराष्ट्र सरकार ‘केरळ मॉडेल’चा मार्ग न स्वीकारता पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्याशी समन्वय साधून काम करीत आहे, करोना युद्धाचे नेतृत्व पंतप्रधान मोदींकडेच आहे व राहील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. हे जर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या पचनी पडत नसेल तर त्यांनी खुशाल आंदोलन करावे. मात्र हे आंदोलन त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात ठरेल हे त्यांनी लक्षात ठेवावे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या डोक्यावर ताणतणावामुळे परिणाम झाला आहे. जनतेने त्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिले आहे व भाजपवाले काही करू किंवा बोलू लागले तर लोक त्यांना हसून विचारत आहेत की, ”मेरे, आंगने में तुम्हारा क्या काम है?” या सगळय़ाचे वैफल्य येणे साहजिकच आहे. महाराष्ट्रात करोनाच्या निमित्ताने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत व सरकार त्या प्रश्नांशी झगडत आहे हे खरेच. महाराष्ट्र राज्य हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपले वाटत असेल तर त्यांनी प्रश्न सोडविण्याच्या कामी राज्य सरकारला सहकार्य केले पाहिजे. राज्यपालांच्या ‘अंगणात’ लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा केली पाहिजे.

ही वेळ लढण्याची, वाद उगाळण्याची नाही, असे पंतप्रधान मोदी यांचे सांगणे आहे, पण महाराष्ट्र भाजपचे नेमके पंतप्रधान मोदी यांच्या उलट सुरू आहे. ही कसली शिस्त म्हणायची? पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या सूचनेवरून पाटील-फडणवीस मंडळ महाराष्ट्रात स्वत:चेच तोंड काळे करण्याचे आंदोलन करीत आहेत असे वाटत नाही. ही आंदोलनाची मूळव्याध त्यांची त्यांनाच उपटलेली दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 7:39 am

Web Title: shiv sena saamna editorial criticize bjp devendra fadnavis chandrakant patil maharashtra bachao andolan covid 19 jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : सांगलीत आणखी तिघांना करोना
2 पंजाबमध्ये अडकलेले ७०० सांगलीकर पुन्हा गावी
3 सात वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या
Just Now!
X