News Flash

“एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणं हे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखण्यासारखं”

कन्नड संघटनेचे लोक भाजपाशी निगडीत आहेत.

भाजपच्या राज्यात न्याय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्या मिळतात हे आता पक्के झाले आहे, असं म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे. भाजपचे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार असल्याचे म्हणवून घेते. मग बेळगावात ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळ्या घालण्याची भाषा केली जाते ते मराठी बांधव काय ‘पाकडे’ आहेत? ते हिंदूच आहेत. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व? आता गोळ्या घालण्याची भाषा सुरू झाली. एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखण्यासारखे आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.

दोन दिवसांपूर्वीच कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषीत अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाषावार प्रांतरचनेदरम्यान कर्नाटकात अडकलेल्या मराठी भाषिकांना आणि हा लढा सुरू ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आता शिवसेनेनं निशाणा साधला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून यावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, अशी भाषा कन्नड संघटनेने केली आहे. हे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. कर्नाटकात कोणाचेही राज्य आले तरी सीमा भागातील मराठी मंडळींवरील अन्याय-अत्याचार काही थांबत नाहीत. उलट सत्ताधाऱयांत अत्याचार करण्याची चढाओढच लागलेली असते. आताही कोणी एक भीमाशंकर पाटील व त्याची कर्नाटक नवनिर्माण सेना आहे. त्याने बेळगावात येऊन सांगितले की, ‘सीमा प्रश्नावरून गेली ६० वर्षे बेळगावच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावच्या सीमेवर थांबवून गोळ्या घातल्या पाहिजेत. त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल.’ मराठी माणसांना चिरडण्याचे व भरडण्याचे प्रयोग गेल्या ६० वर्षांपासून सुरूच आहेत, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
गेल्या ६० वर्षांपासून सीमा भागातील मराठी माणूस कानडी सरकारच्या गोळ्या आणि लाठ्याकाठ्याच खात आहे. पण सीमालढा काही थांबला नाही, कारण तो सत्य आणि न्यायाचा लढा आहे. भाजप पुढाऱयांच्या तोंडी सध्या ऊठसूट गोळ्या घालण्याची भाषा वाढली आहे. हे त्यांचे वैफल्य आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनीही सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱया लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे बजावले. अंगडी हेसुद्धा बेळगावचेच आहेत. भाजपच्या राज्यात न्याय मागणाऱयांना बंदुकीच्या गोळय़ा मिळतात हे आता पक्के झाले.

बेळगाव, कारवार, भालकी, निपाणीमधल्या मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात येण्यासाठीचा हा लढा आजचा नाही. तो साठ वर्षांहून जास्त जुना आहे. हे लढे चिरडले, रक्तपात केला. सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबातून नव्या लढय़ाची प्रेरणा मराठी बांधवांना मिळाली आहे. त्यात आता महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व तेही उद्धव ठाकरे आहेत. सीमा प्रश्नासाठी ६९ हुतात्म्यांचे बलिदान देणारा पक्ष राज्यात सत्तेवर आहे व काँगेस-राष्ट्रवादीचे नेते सीमाप्रश्नी शिवसेनेच्या सोबतीला आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याची भाषा ज्यांनी केली त्यांनी आधी आमच्या सीमा पार करून एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ अंगावर येणाऱयांचा कसा फडशा पाडतात ते समजेल. महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी समन्वय मंत्री नेमले आहेत व हे मंत्री मागच्या भाजप सरकारने नेमले तसे नाहीत. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व? आता गोळ्या घालण्याची भाषा सुरू झाली. एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखणे. एकदा धाडस करून बघाच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 7:56 am

Web Title: shiv sena saamna editorial criticize karnataka navanirman sena bhimashankar patil maharashtra ekikaran samiti jud 87
Next Stories
1 कर्जबाजारी शेतकऱ्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडून बँकेशी संबंधितांना पाचारण!
2 खासगी बस पेटली;  ३४ प्रवासी बचावले
3 विरारमध्ये गृहिणीची हत्या
Just Now!
X