सत्तेसाठी शिवसेनेने रंग बदलला अशी भाषा करणे हे अकलेची दिवाळखोरी निघाल्याचे लक्षण आहे. शिवसेनेने रंग बदलला असे विचारणाऱ्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावरील मुखवटे व चेहऱ्यावरचा अनेक रंगी मेकअप तपासून घ्यायला हवा, असं म्हणत शिवसेनेनं मनसे आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपानं २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये सरड्याप्रमाणे रंग बदलल्यानेच, भगवा रंग कायम ठेवून शिवसेना महाविकास आघाडीत सामील झाली. आता शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत शिरूनही ‘बाणा’ बदलायला तयार नाही याची खात्री पटताच हिंदुत्ववादी मतांत विभाजन करण्याचा डाव रचला गेला आहे, असा आरोप शिवसेनेना केला आहे. गेल्या १४ वर्षांत राज ठाकरे यांना ‘मराठी’ प्रश्नावर काही भव्य काम करता आले नाही व आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाग्य आजमवता येईल काय? याबाबत शंकाच जास्त आहेत. ‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत, असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेनं टीकेचा बाण सोडला आहे.

नागरिकत्व कायद्याला आता आपला पाठिंबा असून या कायद्याच्या समर्थनासाठी आपण मोर्चा काढणार आहोत, पण एक महिन्यापूर्वी त्यांची नेमकी वेगळी व उलटी भूमिका होती. राज ठाकरे यांनी या कायद्यास तळमळीने विरोध केला होता. आर्थिक मंदी-बेरोजगारी अशा गंभीर प्रश्नांवरून देशाचे लक्ष वळविण्यासाठी अमित शहा या कायद्याची खेळी करीत आहेत व ही खेळी यशस्वी होत असल्याचे त्यांचे मत होते, पण फक्त एकाच महिन्यात राज ठाकरेही त्याच खेळीचे यशस्वी बळी ठरले असून त्यांनी ‘सीएए’ कायद्याच्या पाठिंब्याचा नवा झेंडा खांद्यावर घेतला आहे. दोन झेंडे का? हे यानिमित्ताने स्पष्ट झाले, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

बाळासाहेबांच्या जुन्या भाषणाची कॉपी वाचली

मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांच्या भाषणानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची आठवण करून दिली होती. यावरूनही शिवसेनेनं राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. बाळासाहेबांच्या एखाद्या जुन्या भाषणाची जशीच्या तशी ‘कॉपी’ वाचून दाखवली गेली. मग त्यात मंदिराच्या आरत्या, मुसलमानांचे नमाज, बांगलादेशींची हकालपट्टी हे विषय जसेच्या तसे आलेच आहेत. वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा, असं म्हणत शिवसेनेनं मनसेवर निशाणा साधला आहे.