वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा असं म्हणत शिवसेनेनं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरूवारी मुंबईत मनसेचं पहिलं राज्यव्यापी आंदोलन पार पडलं. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्याचं पहायला मिळालं होतं. राज ठाकरे पक्षाच्या झेंड्यातही बदल केला. भगव्या रंगाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला मनसेच्या नव्या झेंड्याचं त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं. यावरून आता शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत. बाळासाहेबांच्या एखाद्या जुन्या भाषणाची जशीच्या तशी ‘कॉपी’ वाचून दाखवली गेली. मग त्यात मंदिराच्या आरत्या, मुसलमानांचे नमाज, बांगलादेशींची हकालपट्टी हे विषय जसेच्या तसे आलेच आहेत. वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा!

देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलून द्या. नव्हे हाकलायलाच पाहिजे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाने झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची आहे. दुसरी गंमत अशी की, त्यासाठी एक नव्हे, दोन दोन झेंड्यांची योजना करणे हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे. राज ठाकरे व त्यांच्या १४ वर्षे जुन्या पक्षाने मराठी हा मुद्दा घेऊन आधी पक्षाची स्थापना केली, पण आता त्यांचा पक्ष हिंदुत्ववादाकडे वळला असे एकंदरीत दिसते. आडवळणाने वळत आहे असे म्हणणे सोयीचे ठरेल. शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर भरपूर काम करून ठेवले आहे. त्यामुळे मराठी मनास साद घालून हाती काहीच लागले नाही.

शिवसेनेने प्रखर हिंदुत्वाच्या विषयावरही देशभरात मोठे जागरण व काम केले आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेने हिंदुत्वाचा भगवा रंग कधीच सोडला नाही. हा रंग तसाच राहील. त्यामुळे दोन झेंडे निर्माण करूनही राज यांच्या झेंड्यास वैचारिक पाठबळाचा दांडा मिळण्याची शक्यता दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. यास रंग बदलणे कसे म्हणाल? त्याबाबत आक्षेप कमी व पोटदुखी जास्त. भाजप किंवा इतरांनी अगदी मेहबुबापासून इतर कुणाशीही निकाह लावला तरी चालतो, पण ही राजकीय व्यवस्था इतर कोणी केली की ते पाप ठरते. आम्ही सरकार स्थापन केले हे पाप नसून समाजकार्य आहे.

संसदीय लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्ष आपापले अजेंडे व झेंडे घेऊन काम करीत असतो, पण शिवसेनेसारखा पक्ष ‘एक झेंडा एक नेता’ घेऊन पंचावन्न वर्षे काम करतो आहे. ही एक तपस्या आहे व त्यागही आहे. सत्तेसाठी शिवसेनेने रंग बदलला अशी भाषा करणे हे अकलेची दिवाळखोरी निघाल्याचे लक्षण आहे. शिवसेनेने रंग बदलला असे विचारणाऱ्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावरील मुखवटे व चेहऱ्यावरचा अनेक रंगी मेकअप तपासून घ्यायला हवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena saamna editorial criticize mns chief raj thackeray on hindutva jud
First published on: 25-01-2020 at 07:23 IST