मला शेती कळत नाही पण शेतक-यांचे अश्रू कळतात, शेतक-यांना कर्जातून मुक्त केलेच पाहिजे. मी शेतक-यांना उपदेश देण्यासाठी येथे आलेलो नाही तर त्यांना मदत करण्यासाठी आलोयं, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बीड दौ-यावर आहेत, त्यावेळी ते बोलत होते.
‘राज्‍यात यंदा भीषण दुष्‍काळ पडला आहे. त्‍यामुळे दुष्‍काळपीडित शेतकऱ्यांना मदत करण्‍यासाठी शिवसेना तत्‍पर असून, आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकऱ्यांच्‍या मुलींच्‍या लग्‍नासाठी पक्ष मदत करणार आहे’, अशी घोषणा उद्धव यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री आले घोषणा करून गेले. मुख्यमंत्री पाऊस नाही पण घोषणांचा पाऊस करून गेले‘ तसेच केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नसेल तर त्या घोषणांचा उपयोग काय असा सवालही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन होत असले, तरी या कार्यक्रमातून शिवसेनेला पूर्णपणे डावलले जात असल्याने नाराज उद्धव ठाकरे यांनी बीडला येऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका घेतल्याने सत्ताधारी युतीअंतर्गत वातावरण गरम झाले आहे. तसेच, पंतप्रधान मोदी यांच्या आजच्या मुंबई दौ-यातील सर्व कार्यक्रमांवर शिवसेनेने बहिष्कार टाकल्याची माहिती आहे. उद्धव जरी बीड दौ-यावर असले तरी त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना मोदींच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी न लावण्याचा आदेश दिल्याचे कळते.