06 March 2021

News Flash

सत्तेसाठी सेनेची नैसर्गिक की अनैसर्गिक युती?

राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये मिळालेल्या यशाने भाजपचे जिंकणार, असे वातावरण तयार करण्यात आले होते.

भाजपला मोठा फटका; असंघाशी संघ भोवले

मोहिनीराज लहाडे, नगर

राज्यभर सर्व महानगरपालिका जिंकण्याचा सपाटा भाजपने लावला असला तरी नगर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेनेजिंकल्याने भाजपला मोठा फटका बसला आहे. आपणच जिंकणार अशी हवा भाजपने निर्माण केली होती. पण नगरकरांनी भाजपला जमिनीवर आणले आहे. प्रचाराच्या काळात शिवसेना आणि भाजपने परस्परांच्या विरोधात अगदी खालच्या पातळीवर प्रचार झाल्याने सत्ता संपादनासाठी शिवसेना व भाजप हे नैसर्गिक मित्र युती करणार की अनैसर्गिक युती होणार याचीच आता उत्सुकता आहे.

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपने हवा तयार केली होती. राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये मिळालेल्या यशाने भाजपचे जिंकणार, असे वातावरण तयार करण्यात आले होते. सत्तासंपादनासाठी किंवा विजयासाठी अन्य पक्षांमधील प्रभावी नेत्यांनी पावन करून घेण्याचा प्रयोग नगरमध्येही करण्यात आला. यातून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील मासे गळाला लावण्यात आले. केडगाव हत्याप्रकरणातील कोतकर यांच्या निकटवर्तीयांना जवळ करून भाजपने असंगाशी संग केले. त्याचाही फटका भाजपला बसला. हे चारही जण निवडून आले असले तरी त्याची प्रतिक्रिया शहराच्या अन्य भागांमध्ये उमटली. भाजपने सारी ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, राम शिंदे आदी मंत्र्यांच्या प्रचार सभा झाल्या. शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. पण त्याचा काहीही फायदा झालेला दिसत नाही. पाच वर्षांपूर्वी नगरमध्ये भाजपचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. यंदा यात पाचने वाढ झाली आहे. मात्र, अन्य शहरांमध्ये मिळालेल्या यशाच्या पाश्र्वभूमीवर भाजपला नगरकरांनी नाकारलेले आहे.

शिवसेनेने सर्वाधिक २४ जागा जिंकल्या आहेत. केडगाव हत्याप्रकरणात शिवसेनेबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. याचा फायदा शिवसेनेला झाला. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा अपवादवगळता अन्य कोणीही शिवसेनेचे नेते प्रचारासाठी फिरकले नाहीत. शिवसेनेला २४ जागा मिळाल्या असल्या तरी महापौरपदासाठी ११ जागा कमी पडत आहेत. शिवसेना २४ आणि भाजप १४ असे संख्याबळ जमू शकते. पण प्रचाराच्या काळात शिवसेना आणि भाजपात कटुता आली होती. त्यातच भाजपमधील खासदार दिलीप गांधी गट आणि शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड यांचा गट युती करण्याच्या विरोधात आहेत. वरिष्ठ पातळीवर काही प्रयत्न झाले तरच युती होऊ शकते.

राष्ट्रवादीने गेल्या वेळऐवढेच संख्याबळ कायम राखले आहे. राष्ट्रवादीचे १८ उमेदवार निवडून आले असून, आघाडीत काँग्रेसचे फक्त पाच जणच निवडून आले आहेत. आमदार संग्राम जगताप यांना केडगाव हत्येप्रकरणी झालेल्या अटकेचा राष्ट्रवादीने मुद्दा केला होता. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आमदार जगताप यांनी व्यक्त केली होती. काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. गेल्या वेळी ११ नगरसेवक निवडून आले होते. यंदा संख्याबळ घटले आहे. नगर लोकसभा मतदारसंघ आघाडीत मिळावा म्हणून काँग्रेसचा आग्रह आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय हे लोकसभा लढण्याच्या तयारीत आहेत. यामुळेच नगर महापालिका निवडणुकीत त्यांनी लक्ष घातले होते. आतापर्यंत ग्रामीण भागाकडे लक्ष देणाऱ्या सुजय विखे-पाटील यांनी शहरात पहिल्यांच रस घेतला, पण शहरात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. विखे-पाटील यांच्यासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा आहे.

बसपचे चार जण निवडून आले असले तरी हे सारे पूर्वाश्रमीचे शिवसेना वा काँग्रेसचे आहेत. मुस्लीमबहुल प्रभागात या मंडळींनी बसपच्या हत्तीच्या चिन्हावर निवडणूक लढविली आणि चारही जागा निवडून आल्या आहेत. शिवसेनेला सत्ता संपादनासाठी बसपचे चार जण मदत करू शकतात.

शिवसेना-भाजपचे जुळू न शकल्यास शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. साऱ्या शक्यतांचा विचार करूनच सत्ता संपादनाच्या दृष्टीने प्रयत्न होतील.

संख्याबळ एकूण जागा     ६८

शिवसेना                         २४

राष्ट्रवादी                         १८

भाजप                             १४

काँग्रेस                              ५

बसपा                               ४

समाजवादी पार्टी               १

अपक्ष                                २

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2018 2:04 am

Web Title: shiv sena single largest party in ahmednagar municipal corporation election
Next Stories
1 स्वयंचलित ठिबक सिंचनाकडे शेतकऱ्यांची पावले
2 जनसंघर्ष यात्रेद्वारे काँग्रेस आक्रमक, पण..
3 पुणे जिल्ह्यातून संशयित दहशतवाद्याला अटक, एटीएसची कारवाई
Just Now!
X