अयोध्येत श्रीरामाचा पुतळा उभारण्याची घोषणा भाजपाने केली असतानाच यावरुन आता शिवसेनेने भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. इंडोनेशिया, मॉरिशससारख्या देशांत, नेपाळात राममंदिरे भव्य मूर्तीसह उभी राहत आहे. आता रामाची एक मोठी पुतळावजा मूर्ती उभी करून तुम्ही कोणत्या झाडाची पाने हिंदूंच्या तोंडास पुसत आहात, असा सवाल शिवसेनेने भाजपाला विचारला आहे. आजवर बोधीवृक्ष माहीत होता, पण आता जनतेच्या तोंडास पाने पुसण्याचा जो ‘मोदी-वृक्ष’ निर्माण झाला आहे त्या झाडाची पाने पाचोळ्यासारखी अयोध्येतही उडू लागली आहेत. पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत श्रीरामाचा ब्रॉन्झचा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. यावरुन शनिवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला. २५ वर्षांपूर्वी भाजपाने राम जन्मभूमीवरच मंदिर उभारायचे. मंदिर वही बनाएंगे म्हणजे बनाएंगेच, अशी घोषणा केली होती. यासाठी अयोध्येत मोठे आंदोलन झाले त्यात शेकडो कारसेवकांची आहुती पडली. त्या आहुतीतूनच भाजपाच्या डोक्यावर आजचा राजमुकुट चढला आहे. मात्र आता राममंदिराचा विषय बाजूला ठेवून अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. सरकार बहुधा सर्वच पातळ्यांवर नालायक ठरल्याने पुन्हा अयोध्येचा विषय हाती घेऊन लोकांना भ्रमित करण्याचे ठरवलेले दिसते, असा टोला शिवसेनेने लगावला.
योगी महाराजांनी अयोध्या दौऱ्यात आणखी एक घोषणा केली होती. फैजाबादचे नामकरण त्यांनी ‘अयोध्या’ असे केले. कारसेवकांची मागणी राममंदिराची होती. पण सरकारने त्यांना पुतळा व फैजाबादचे नामकरण दिले. उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपातर्फे दिलेला हा ‘लॉलीपॉप’ असून हा लॉलीपॉप चघळत बसा व पुन्हा एकदा रामाच्या नावावर मतदान करा, असे भाजपाचे हिंदुत्ववाद्यांना सांगणे आहे, अशी टीकाही शिवसेनेने केली.
प्रभू श्रीरामाचे कोणी एजंट नाहीत. ते कोट्यवधी हिंदूंच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहेत.श्रीरामास अयोध्येच्या तुरुंगातून मुक्त करून त्यांना मंदिरात विराजमान करण्याची त्यांची मागणी आहे. निवडणुकांसाठी ‘राममंदिर’ पुन्हा जुमल्यांसारखे वापरणार असाल तर हिंदुत्वास खांदा देण्याची वेळ येईल. त्यामुळे राममंदिर बाजूला ठेवून पुतळ्याचे लॉलीपॉप दाखविणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 7:38 am